क्रूझ रेव्ह पार्टीप्रकरणी नवा गौप्यस्फोट
प्रतिनिधी/ मुंबई
कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणाला आणखी एक वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणी अटकेत असलेल्या आर्यन खानच्या सुटकेसाठी 25 कोटी रुपयांचा सौदा (डील) झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यातील 8 कोटी रुपये एनसीबीचे विभागीय प्रमुख समीर वानखेडे यांना मिळणार असल्याचा दावाही केला आहे. या प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावीचा सुरक्षारक्षक प्रभाकर साईलचा हा व्हिडीओ आहे. तो या पार्टी प्रकरणातील पंचही होता. मात्र प्रभाकरने स्वतःच व्हिडीओ व्हायरल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
एनसीबी रेडचा पंच क्रमांक 1 असलेला प्रभाकर साईलने या प्रकरणात त्याच्याकडून पंच म्हणून काही रिकाम्या पेपरवर सही घेतल्याचे सांगितले आहे. छाप्याच्या दिवशी किरण गोसावीने प्रभाकर साईलला येलो गेटवर बोलावले आणि त्यानंतर गोसावीला फोनवर बोलताना ऐकले. या सर्व प्रकरणामुळे साईलच्या जीवाला धोका होता म्हणून तो 10-12 दिवस सोलापूर येथील परिचिताकडे राहिल्याचे सांगितले.
साईलने गोसावीचा लपून व्हिडीओ केला असून त्यात आर्यनला मोबाईलवर बोलायला लावल्याचे दिसत आहे. प्रभाकर साईलने आर्यन खानच्या सुटकेसाठी 25 कोटी रुपयांची मागणी केल्याचे सांगितले. पण ही डील 18 कोटींवर झाली. त्यातले 8 कोटी समीर वानखेडेंना आणि उर्वरित पैसे आपल्यात वाटून घ्यायचे असे गोसावी यांच्यात ठरले, असे सर्व संभाषण साईलने ऐकल्याचे व्हिडिओतून सांगितले आहे.
प्रभाकर साईल हा किरण गोसावीकडे अंगरक्षक म्हणून 22 जुलै 2021 ला रुजू झाला. पण वैयक्तिक प्रॉब्लेममुळे प्रभाकर साईल 30 जुलै 2021 रोजी सर्व कपडे घेऊन कायमचा किरण गोसावीकडे ठाण्याच्या राहत्या घरी राहायला गेला. प्रभाकर साईलचे राहणे, पगार सर्व काही ठरले. पण 8 सप्टेंबरला किरण गोसावीने ठाण्यातील घर सोडले आणि त्यानंतर वाशीला शिफ्ट झाला, असे प्रभाकरने सांगितले आहे. प्रभाकरच्या व्हिडीओची जोरदार चर्चा होत आहे. या व्हिडीओची खातरजमा होणे अद्याप बाकी आहे. त्यामुळेच याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
…काय आहे व्हिडीओत?
आम्ही लोवर परेलच्या दिशेने गेलो. तिथे ब्रिजखाली आमची गाडी जाऊन उभी राहिली. पाठिमागून इनोव्हा कार आली. अचानक त्या गाडीमागे निळय़ा रंगाची मर्सिडिज आली. मी जाऊन बघितले तर त्या गाडीत शाहरुख खानची मॅनेजर बसलेली होती. यानंतर किरण गोसावी, समीर आणि पूजा दादलानी या तिघांमध्ये बैठक झाली. या बैठकीत काय झाले हे मला समजले नाही. गाडीमधून पुन्हा त्यांनी फोन केला की 25 सांग, शेवटी 18 फायनल कर, कारण त्यातील 8 वानखेडेंना जाणार आहेत. तसेच 10 आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. मी एवढे त्यांचे फोनवरचे संभाषण ऐकले’ अशी माहिती प्रभाकर साईलने दिलीय.