अवैद्यरित्याकोळसावाहतूकप्रकरणीमिनीटेंपो,ट्रक,चालक-क्लिनर,मजूरताब्यात

प्रतिनिधी / फोंडा
आर्ल केरी येथे विनापरवाना कोळसा वाहतूक करणाऱया वाहनाला ग्रामस्थांनी अडविल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. सदर घटना काल गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर कारवाई करताना कोळसावाहू ट्रक, मिनी टेंपो जप्त करण्यात आला असून चालक-क्लिनर व मजूरांनाही ताब्यात घेतले आहे.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बागालकोट कर्नाटक येथून ट्रकमधून आणलेला कोळसा आर्ल केरी येथे मिनी टेंपोमध्ये उतरवून एका गोदामात साठविण्यात येत असल्याचा प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. संशयास्पद प्रकरण असल्यामुळे ग्रामस्थांनी हालचाली करून सर्व ग्रामस्थ एकवटल्यानंतर याविषयी जाब विचारण्यात आला. सुमारे एक टन कोळशासह बागलकोट कर्नाटक हून कोळसा गोव्यात आणला जात होता. यावेळी कोळसावाहून ट्रक आर्ल केरी येथे पोचेपर्यंत गोवा हद्दीत प्रवेश करताना मालाच्या परवान्याची कुठेच विचारणा झाली कशी झाली नाही याबाबत संशय व्यक्त केला आहे.
कोळसा हाताळणी मागील दहा वर्षापासून
सरपंच अनिशा गावडे, फोंडा पोलीस स्थानकाचे निरीक्षक मोहन गावडे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी ट्रकमालकाकडे कोळसा वाहतूकीची कायदेशीर कागदपत्रे नसल्याचे आढळले. पंचायत क्षेत्रात कोळसा गोदाम आहेत याबाबत सरपंचही अनभिज्ञ असल्याचे सांगण्यात आले. तेव्हा गोदाम मालक प्रेमानंद गुरव यांच्यांशी चौकशीअंती सदर प्रकाराबाबत कुठलीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सदर भाडेकरूचा करार रद्द करण्याचे आश्वासन दिले.
मात्र गोदाम भाडीपट्टीवर घेतलेला कंत्राटदाराच्या म्हणण्यानुसार मागील दहा वर्षापासून कोळसा वाहतूक करीत आहे. तसेच कोळसा फोंडय़ातील व्यवसायिकांना पुरविण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. परंतू गोदाम मालकांने सदर घटनेविषयी हात वर काढल्याने ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. दरम्यान अवैद्यरित्या कोळसा वाहतूक करणाऱया वाहने, ट्रक व मिनी टेंपो फोंडा पोलिसांनी जप्त केले आहे.तसेच ट्रकचालक, क्लिनर व मजूरांना ताब्यात घेतले असून निरीक्षक मोहन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली फोंडा पोलीस अधिक तपास करीत आहे.