कास्यपदक विजेती मिराबाई छानूचा नवा विश्वविक्रम
वृत्तसंस्था/ ताश्कंद
आशियाई वेटलिफ्टींग स्पर्धेत रविवारी भारताची महिला वेटलिफ्टर झिली दलबेहराने 45 किलो वजनगटात सुवर्णपदक पटकाविले. भारताची माजी विश्व़विजेती मिराबाई छानूने 49 किलो वजनगटात कास्यपदक मिळविताना क्लीन आणि जर्कमध्ये नवा विश्वविक्रम नोंदविला.
महिलांच्या 45 किलो वजनगटात भारताच्या झिली दलबेहराने स्नँचमध्ये 69 किलो तर क्लीन आणि जर्कमध्ये 88 किलो असे एकूण 157 किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकाविले. ऑलिंपिक स्पर्धेसाठी महिलांच्या 45 किलो वजनगटाचा समावेश नाही तथापि आशियाई वेटलिफ्टींग स्पर्धेत या वजनगटात फिलिपिन्सच्या मेरी डायझने एकूण 135 किलो वजन उचलत रौप्यपदक मिळविले. झिलीने गेल्यावेळी झालेल्या या स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. या स्पर्धेतील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक आहे.
भारताची माजी विश्वविजेती मिराबाई छानूने 49 किलो वजनगटात क्लिन आणि जर्कमध्ये नवा विश्वविक्रम नोंदविताना 119 किलो वजन उचलले. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱया छानूने स्नँचमध्ये 86 किलो तर एकूण 205 किलो वजन उचलत कास्यपदक पटकाविले. 26 वर्षीय छानूने अलिकडच्या कालावधीत ऑलिंपिकसाठी सहा विविध पात्र फेरी स्पर्धामध्ये आपला सहभाग दर्शविला.