8 महिन्यांपासून उभ्या असलेल्या कारमध्ये 13 वषीय तरुणाचा मृतदेह सापडला, मुलीचे वडील 3 वर्षांपूर्वीपासून गायब
गोंडा / वृत्तसंस्था
बलात्कार प्रकरणी तुरुंगात असलेल्या आसारामबापूंच्या गोंडा येथील आश्रमात एका 13 वषीय मुलीचा मृतदेह कारमध्ये सापडल्याने खळबळ निर्माण झाली आहे. हा आश्रम विमौर गावात आहे. पोलिसांनी संपूर्ण आश्रम सील केला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मुलगी गेल्या 3 दिवसांपासून घरातून बेपत्ता होती.
आश्रम परिसरातील एका कारमध्ये मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली. सदर कार सुमारे 8 महिन्यांपासून येथे उभी असल्याचे आश्रमाच्या चौकीदाराने सांगितले. कारमधून अचानक उग्र वास आल्याने कार उघडली असता त्यात मुलीचा मृतदेह दिसला, त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह बाहेर काढला आणि कार सील केली. ओळख लपवण्यासाठी मुलीच्या चेहऱयावर केमिकल टाकण्यात आल्याचे दिसून आले आहे. प्राथमिक चौकशीअंती जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचे समजते. तसेच कुटुंबप्रमुख 3 वर्षांपूर्वी बेपत्ता झाल्याचे सांगण्यात येत आहे. आजपर्यंत कुटुंबप्रमुख सापडलेला नाही. मुलीच्या आईने 7 जणांविरोधात फिर्याद दिली आहे. आता फॉरेन्सिक टीमच्या मदतीने पोलीस तपास केला जात आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आसाराम जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. आसाराम सध्या जोधपूर तुरुंगात आहेत. ऑगस्ट 2013 मध्ये बलात्कार प्रकरण उघडकीस आल्यानंतर आसारामना अटक करण्यात आली होती. बलात्कार प्रकरणाचा निकाल येण्यास तब्बल 5 वर्षे लागली.