प्रतिनिधी / वास्को
राज्यातील इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना देण्यात येणारे शासकीय अनुदान बंद करण्यात यावे या मागणीसाठी गुरूवारी भारतीय भाषा सुरक्षा मंचने वास्कोतील पालिका इमारतीसमोर निदर्शने केली. इंग्रजी माध्यमाच्या प्राथमीक शाळांना देण्यात येणारे अनुदान बंद न केल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या शून्यावर आल्यावाचून राहणार नाही असा ईशारा यावेळी भारतीय भाषा सुरक्षा मंचने दिला.
गुरूवारी संध्याकाळी 4 ते 6 वा. दरम्यान ही निदर्शने करण्यात आली. कार्यकर्त्यांनी इंग्रजी माध्यमाला अनुदान देण्याच्या प्रकाराला विरोध करणारे फलक हाती घेतले होते. अनुदान विरोधात घोषणाही यावेळी देण्यात आल्या. गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष नितीन फळदेसाई तसेच भाभासुमंचे कार्यकर्ते योगेश शेट तानावडे, गणेश गावडे व भक्ती खडपकर यांनी केवळ गोव्यातील मातृभाषांनाच प्राथमीक शिक्षणासाठी शासकीय अनुदान देण्यात यावे आणि इंग्रजी प्राथमीक शिक्षणासाठी अनुदान देण्यात येऊ नये या मागणीसाठी मागच्या दहा वर्षांपासून चाललेल्या आंदोलनाची माहिती देऊन 2012 साली सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारनेही कशी पाठ फिरवली यावरही भाष्य केले. आजही भाजपाचे राज्य सरकार इंग्रजी शाळांना देण्यात येणारे अनुदान बंद करीत नाही असे सांगून त्यांनी राज्य सरकारच्या कृतीचा निषेध केला. प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी या निदर्शनांच्या समारोपाच्या भाषणात गेल्या नऊ वर्षांपासून राज्यात सत्तेर असलेल्या भाजपा सरकारचे शिक्षण माध्यम प्रश्नावर वाभाडे काढले. मनोहर पर्रीकर यांनी त्यावेळी मातृभाषाप्रेमींच्या आंदोलनात सहभागी होऊन सत्तेवरच येताच मातृभाषाप्रेमींचा कसा विश्वासघात केला याचीही माहिती दिली. सरकारने अजूनही इंग्रजी शाळांचे अनुदान बंद केलेले नाही. ते बंद करण्यात यावे यासाठी पुन्हा उग्र आंदोलन करण्यात येणार आहे. शिक्षण माध्यमाच्या प्रश्नावर सरकारविरूध्द झालेल्या आंदोलनामुळेच मागच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला तेरा जगांवर समाधान मानावे लागले होते. आताही इंग्रजी शाळांचे अनुदान बंद न झाल्यास होणाऱया उग्र आंदोलनामुळे सरकारची अवस्था पळता भुई थोडी करू. सरकारला जाग न आल्यास येत्या निवडणुकीत भाजपा तेरावरून शुन्यावर आल्यावाचून राहणार नाही असा ईशारा वेलिंगकर यांनी दिला. प्रस्तावीक व सुत्रसंचालन समीर कुटवाळकर यांनी केले. साईनाथ नाईक, शेखर पालयेकर, आनंद गुरव, गुरू नागवेकर, विशाखा फळदेसाई, अनुप्रीता गुरव, सविता सातार्डेकर, निता सावईवेरेकर, रूपा नाईक व इतर बरेच कार्यकर्ते या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते.