वृत्तसंस्था/ केपटाऊन
‘सामनावीर’ जॉनी बेअरस्टोच्या शानदार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने यजमान दक्षिण आफ्रिकेचा चार चेंडू बाकी ठेवून पाच गडय़ांनी पराभव करत तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत विजयी सलामी दिली. बेअरस्टोने 48 चेंडूत चार षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 86 धावांची खेळी केली.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 6 बाद 179 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंडने 19.2 षटकांत पाच बाद 183 धावा जमवित विजय नोंदविला.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या डावात कर्णधार डिकॉक आणि डु प्लेसिस यांनी दुसऱया गडय़ासाठी 8.3 षटकांत 77 धावांची भागिदारी केली. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेचा सलामीचा फलंदाज बेहुमा पहिल्याच षटकांतील शेवटच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्याने एक चौकारांसह पाच धावा जमविल्या. इंग्लंडच्या करेनने त्याला झेलबाद केले. जॉर्डनने डिकॉकला मॉर्गनकरवी झेलबाद केले. त्याने 23 चेंडूत एक षटकार आणि 2 चौकारांसह 30 धावा जमविल्या.
डुप्लेसिसने 40 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 58, व्हॅन डेर डय़ुसेनने 28 चेंडूत 3 षटकारासह 37, क्लेसनने 12 चेंडूत दोन चौकारांसह 20, लिनेडीने 6 चेंडूत 1 षटकार 1 चौकारांसह 12 आणि बिजॉनने 6 चेंडूत नाबाद 7 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 7 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे सॅम करेन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 28 धावांत 3 तर आर्चर, टॉम करेन आणि जॉर्डन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. जॉर्ज लिनेडीच्या पहिल्याच षटकांतील दुसऱया चेंडूवर इंग्लंडचा सलामीचा फलंदाज रॉय खाते उघडण्यापूर्वी झेलबाद झाला. त्यानंतर निगेडीने बटलरला झेलबाद केले. बटलरने 1 चौकारांसह 7 धावा जमविल्या. लिनेडीने इंग्लंडला आणखी एक धक्का देताना मॅलेनला झेलबाद केले. त्याने 20 चेंडूत तीन चौकारांसह 19 धावा जमविल्या. इंग्लंडची स्थिती यावेळी 5.3 षटकांत 3 बाद 34 अशी केविलवाणी होती.
जॉनी बेअरस्टो आणि बेन स्टोक्स या जोडीने चौथ्या गडय़ासाठी 85 धावांची भागिदारी केली. शम्सीने डावातील 15 व्या षटकांत स्टोक्सला झेलबाद केले. स्टोक्सने 27 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारांसह 37 धावा जमविल्या. स्टोक्स बाद झाल्यानंतर कर्णधार मार्गन आणि बेअरस्टो यांनी 5 व्या गडय़ासाठी 40 धावांची भर घातली. दक्षिण आफ्रिकेच्या निगेडीने मॉर्गनला बाद केले. त्याने 10 चेंडूत 1 षटकारांसह 12 धावा जमविल्या. बेअरस्टो आणि सॅम करेन यांनी चार चेंडू बाकी असताना इंग्लंडला पाच गडी राखत विजय मिळवून दिला. करेन एक षटकारासह 7 धावावर नाबाद राहिला. इंग्लंडच्या डावात 9 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडला शेवटच्या चार षटकांत विजयासाठी 51 धावांची जरूरी होती. दरम्यान बेअरस्टोने आक्रमक फटकेबाजी केली. तसेच दक्षिण आफ्रिकेच्या हेंड्रिक्सने आपल्या शेवटच्या षटकांत 28 धावा दिल्याने दक्षिण आफ्रिकेला हा सामना गमवावा लागला. दक्षिण आफ्रिकेतर्फे लिनेडीने 20 धावांत 2, निगेडीने 31 धावांत 2 तर शम्सीने 27 धावांत 1 गडी बाद केला. आता या मालिकेतील दुसरा सामना रविवारी पर्ल येथे होणार आहे.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका 20 षटकांत 6 बाद 179, डु प्लेसिस 58, व्हॅन डेर डय़ुसेन 37, डिकॉक 30, क्लेसन 20, लिनेडी 12, बेहुमा 5, बिजॉन नाबाद 7, सॅम करेन 3-28, आर्चर 1-28, टॉम करेन 1-55,जॉर्डन 1-40)
इंग्लंड 19.2 षटकांत 5 बाद 183 (बेअरस्टो नाबाद 86, स्टोक्स 37,मॅलेन 19, मॉर्गन 12, सॅम करेन नाबाद 7, बटलर 7, रॉय 0, लिनेडी 2-20, निगेडी 2-31, शम्सी 1-27, रेबाडा 0-32, हेंड्रिक्स 0-56, क्लेसन 0-14)