सामनावीर व्हिन्सचे शतक, कार्सचे 5 बळी, बाबर आझमचे शतक वाया
वृत्तसंस्था/ बर्मिंगहम
जेम्स व्हिन्सचे पहिले वनडे शतक आणि लुईस गेगरीच्या 77 धावांच्या बळावर इंग्लंडने तिसऱया सामन्यात पाकचा 3 गडय़ांनी पराभव करून तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 असा एकतर्फी मालिकाविजय मिळविला. व्हीन्सला सामनावीर तर सकिब मेहमूदला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.
या सामन्यात इंग्लंडने पाकला प्रथम फलंदाजी दिल्यावर पाकने बाबर आझमचे शानदार शतक (139 चेंडूत 158), इमाम उल हक (56) व मोहम्मद रिझवान (58 चेंडूत 74) यांच्या अर्धशतकांमुळे 50 षटकांत 9 बाद 331 धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंडच्या ब्रायडन कार्सने 5 तर सकिब मेहमूदने 3 बळी मिळविले. त्यानंतर इंग्लंडने 7 बाद 332 धावा जमवित विजय साकार केला. प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीत खेळणाऱया इंग्लंडच्या दुसऱया संघाने 5 बाद 165 अशी मजल मारली तेव्हा पाक हा सामना जिंकणार, अशी शक्यता निर्माण झाली होती. पण व्हिन्स व ग्रेगरी यांनी सहाव्या गडय़ासाठी 129 धावांची भागीदारी करून सामना इंग्लंडच्या बाजूने फिरविला. व्हिन्सने 95 चेंडूत 102 तर ग्रेगरीने 69 चेंडूत 77 धावा फटकावल्या. दोघे लागोपाठ बाद झाल्यानंतर ओव्हर्टन व कार्स यांनी विजयाचे सोपस्कार 48 व्या षटकात पूर्ण केले. पाकच्या हॅरिस रौफने 65 धावांत 4, शदाब खानने 2 बळी मिळविले.
त्याआधी पाकच्या डावात बाबर आझमने मोहम्मद रिझवानसमवेत 179 धावांची विक्रमी भागीदारी केली. इंग्लंडविरुद्ध कोणत्याही गडय़ासाठीची ही त्यांची सर्वोच्च भागीदारी आहे. सलामीवीर इमाम उल हकने 56 धावा केल्या. 2 बाद 292 अशा स्थितीनंतर पाकचा डाव कोलमडला आणि आणखी केवळ 37 धावांची भर घालताना सात गडी गमविले. कार्सने पहिल्यांदाच पाच बळी मिळविले. आता या दोन संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार असून नियमित कर्णधार इयॉन मॉर्गन या मालिकेत इंग्लंडचे नेतृत्व करणार आहे.
संक्षिप्त धावफलक ः पाक 50 षटकांत 9 बाद 331 ः बाबर आझम 158 (139 चेंडूत 14 चौकार, 4 षटकार), रिझवान 74 (58 चेंडूत 8 चौकार), इमाम उल हक 56 (73 चेंडूत 7 चौकार), फहीम अश्रफ 10, अवांतर 12. गोलंदाजी ः कार्स 5-61, सकिब मेहमूद 3-60, मॅट पार्किन्सन 1-70). इंग्लंड 48 षटकांत 7 बाद 332 ः फिल सॉल्ट 22 चेंडूत 37, क्रॉले 34 चेंडूत 39, व्हिन्स 95 चेंडूत 11 चौकारांसह 102, बेन स्टोक्स 28 चेंडूत 32, गेगरी 69 चेंडूत 6 चौकार, 3 षटकारांसह 77, ओव्हर्टन नाबाद 18, कार्स नाबाद 12, अवांतर 12. गोलंदाजी ः हॅरिस रौफ 4-65, शदाब खान 2-61, हसन अली 1-69.