वृत्तसंस्था/ मिडल्सब्रो
2021 च्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेसाठी येथे झालेल्या शेवटच्या सरावाच्या सामन्यात मार्पूस रॅशफोर्डच्या पेनल्टीवरील एकमेव गोलाच्या आधारे यजमान इंग्लंडने रोमानियाचा 1-0 असा निसटता पराभव केला.
गेल्या बुधवारी झालेल्या सरावाच्या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रीयावर 1-0 अशी मात केली होती. रविवारच्या सामन्यात 78 व्या मिनिटाला रॅशफोर्डने स्पॉट कीकवर इंग्लंडचा एकमेव निर्णायक गोल नोंदविला. 2021 च्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेत इंग्लंड संघाचा ड गटात समावेश असून त्यांचा सलामीचा सामना क्रोएशियाबरोबर पुढील रविवारी होणार आहे. त्याचप्रमाणे इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्यातील सामना 18 जूनला तसेच इंग्लंड आणि झेक प्रजासत्ताक यांच्यातील सामना 22 जूनला खेळविला जाईल. युरो चषक फुटबॉल स्पर्धा 11 जून ते 11 जुलै दरम्यान होणार आहे.