‘सामनावीर’ बटलरचे अर्धशतक ः फिलिप्सचे अर्धशतक वाया
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
कर्णधार जोस बटलर व ऍलेक्स हॅलेस यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर तसेच इंग्लंडच्या अचूक गोलंदाजीमुळे मंगळवारी येथे झालेल्या गट 1 मधील महत्त्वाच्या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा 20 धावांनी पराभव केला. या विजयामुळे टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविण्याचे इंग्लंडचे आव्हान जिवंत राहिले आहे.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लडने 20 षटकात 6 बाद 179 धावा जमविल्या. त्यानंतर न्यूझीलंडने 20 षटकात 6 बाद 159 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 20 धावांनी गमवावा लागला. फिलिप्स मैदानात असेपर्यंत विजयाचे पारडे न्यूझीलंडकडे झुकले होते. पण तो बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजानी न्यूझीलंडच्या फलंदाजांवर दडपण आणले. मंगळवारच्या सामन्यातील विजयामुळे बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघाच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा अधिक पल्लवीत झाल्या आहेत. इंग्लंडने आतापर्यंत प्राथमिक फेरीत चार सामने खेळले असून त्यांचा या गटातील शेवटचा सामना येत्या शनिवारी लंकेबरोबर होणार आहे. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी इंग्लडला लंकेवर विजय मिळविणे जरुरीचे आहे. गट 1 मध्ये आता इंग्लंडचा संघ सरस धावगतीमुळे 5 गुणांसह दुसऱया स्थानावर असून त्यांनी ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे. न्यूझीलंडने आपले अग्रस्थान कायम राखले आहे.

इंग्लंडच्या डावाला कर्णधान बटलर आणि हॅलेस यांनी दमदार सुरुवात करुन देताना 10.2 षटकात 81 धावांची भागीदारी केली. सँटनरने हॅलेसला यष्टीरक्षक करवी यष्टीचित्त केले. त्याने 40 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 52 धावा झळकवल्या. 10 षटकाअखेर इंग्लंडने बिनबाद 77 धावा जमविल्या होत्या. इंग्लंड संघात पुनरागमन करणाऱया 33 वर्षीय हॅलेसने टी-20 प्रकारात 12 डावात आपले तिसरे अर्धशतक झळकविले. न्यूझीलंडचे फिरकी गोलंदाज सँटनर आणि सोधी यांनी इंग्लंडच्या धावांच्या वेगाला आळा घातला. तिसऱया स्थानावर फलंदाजीस आलेल्या मोईन अलीला सोधीने 5 धावावर झेलबाद केले. बटलर आणि मोईन अली यांनी दुसऱया गडय़ासाठी 27 धावांची भर घातली. बटलरने लिव्हींगस्टोन समवेत तिसऱया गडय़ासाठी 45 धावांची भागीदारी केली. लिव्हींगस्टोन फर्ग्युसनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचित झाला. त्याने 14 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 20 धावा जमविल्या. ब्रुकने 7, स्टोक्सने 8 धावा जमविल्या. बटलर सहाव्या गडय़ाच्या रुपात बाद झाला. एकेरी धाव घेण्याच्या नादात तो धावचित झाला. त्याने 47 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह 73 धावा झळकविल्या. सॅम करणने 1 षटकारासह नाबाद 6 तर मलानने नाबाद 3 धावा जमविल्या. इंग्लंडच्या डावात 6 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. कर्णधार जोस बटलरचा हा 100 वा टी-20 सामना होता. बटलरने आपल्या संघाला महत्त्वाचा विजय मिळवून देऊन शतकी सामना साजरा केला. न्यूझीलंडतर्फे फर्ग्युसनने 2, साऊदी, सँटनर आणि सोधी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. वोक्सने कॉन्वेला 3 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर सॅम करणने ऍलेनचा बळी मिळविला. ऍलेनने 11 चेंडूत 1 षटकारासह 16 धावा जमविल्या. न्यूझीलंडची 5 षटकाअखेर स्थिती 2 बाद 28 अशी होती. कर्णधार विलियमसन आणि ग्लेन फिलिप्स या जोडीने संघाला सुस्थितीत नेताना तिसऱया गडय़ासाठी 91 धावांची भागीदारी केली. यावेळी न्यूझीलंडचा संघ विजय मिळवेल असे वाटत होते. स्ट्रोक्सने कर्णधार विलियमसनला रशिदकरवी झेलबाद केले. त्याने 40 चेंडूत 3 चौकारांसह 40 धावा जमविल्या. नीशमने केवळ 6 धावा जमविल्या. वूडने त्याला झेलबाद केले. मिचेल वोक्सच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 3 धावा जमविल्या. फिलिप्सने 36 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांसह 62 धावा झळकाविल्या. या सामन्यात फिलिप्सने 25 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या स्पर्धेत फिलिप्सने लंकेविरुद्ध दणकेबाज शतक झळकविले होते. सॅम करणने फिलिप्सला बदली खेळाडू जॉर्डनकडे झेल देण्यास भाग पाडले. फिलिप्स बाद झाला त्यावेळी न्यूझीलंडची स्थिती 17.3 षटकात 6 बाद 135 अशी होती. न्यूझीलंडला यावेळी विजयासाठी 15 चेंडूत 55 धावांची गरज होती. सँटनर आणि सोधी यांनी विजयासाठी प्रयत्न केले पण ते अपुरे ठरले. 20 षटकात न्यूझीलंडने 6 बाद 159 धावांपर्यंत मजल मारली. सँटनरने 10 चेंडूत 1 षटकारासह नाबाद 16 तर सोधीने नाबाद 6 धावा जमविल्या. न्यूझीलंडच्या डावात 5 षटकार आणि 8 चौकार नोंदविले गेले. इंग्लंडतर्फे वोक्सने 33 धावात 2, सॅम करणने 26 धावात 2, तर मार्क वूड आणि स्टोक्स यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. फिलिप्सला इंग्लंडकडून एक जीवदान मिळाले होते पण त्याला या जीवदानाचा लाभ उठविता आला नाही.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड ः 20 षटकात 6 बाद 179 (बटलर 73, हॅलेस 52, लिव्हींगस्टोन 20, फर्ग्युसन 2-45, साउदी 1-43, सँटनर 1-25, सोधी 1-23), न्यूझीलंड ः 20 षटकात 6 बाद 159 (फिलिप्स 6, विलियमसन 40, ऍलेन 16, सँटनर नाबाद 16, वोक्स 2-33, सॅम करण 2-26, वूड – 25, स्टोक्स 1-10).