नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना कोरोनाला ‘इंडियन कोरोना’ म्हणणं चांगलेच महागात पडलं आहे. कारण त्यांच्याविरोधात क्राईम ब्रँचमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
आयपीसी कलम 188 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 54 नुसार कमलनाथ यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोटी माहिती पसरविल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. भाजपने गुन्हे अन्वेषण विभागाला कमलनाथ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचं निवेदन दिलं होतं. त्यानुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
कमलनाथ यांनी उज्जैनमध्ये पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी कोरोनाला जगात ‘इंडियन कोरोना’ नावाने ओळखले जाईल, असं म्हटलं होतं. यासोबतच सरकारने लाखो लोकांच्या मृत्यूची आकडेवारी लपवल्याचा दावाही कमलनाथ यांच्याकडून करण्यात आला होता. भाजपकडून त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला होता व गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.
घडलेल्या प्रकारानंतर भाजपकडून रविवारी दुपारी हे निवेदन गुन्हे अन्वेषण विभागाला दिलं होतं. त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभागाने संध्याकाळी कमलनाथ यांच्याविरोधात दोन कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. पोलिसांच्या माहितीनुसार ही दोन्ही कलमे जामीनपात्रं आहेत.