वृत्तसंस्था/ इंदोर
मध्यप्रदेशच्या इंदोरमध्ये रस्ते दुर्घटनेत 6 मित्रांचा मृत्यू झाला आहे. पार्टी करून परतत असताना त्यांची कार उभ्या टँकरला पाठीमागून धडकली आहे. दुर्घटनेत कारचा चेंदामेंदा झाला होता. ही दुर्घटना सोमवारी रात्री सुमारे एक वाजता घडली आहे. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी महाराजा यशवंतराव रुग्णालयात नेण्यात आले आहेत.
या दुर्घटनेत कुणाचा हात तर कुणाचे शीर धडावेगळे झाले होते. हे मित्र कारने देवासच्या दिशेने येत होते. कारमधील मृतदेह गॅस कटरच्या मदतीने बाहेर काढण्यात आले आहेत. चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर दोन जणांनी उपचार सुरू असताना अखेरचा श्वास घेतल्याची माहिती लसूडिया पोलीस स्थानकाचे अधिकारी नरसिंह पाल यांनी दिली आहे. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या युवकांचे वय 18 ते 28 वर्षांदरम्यान होते.