प्रतिनिधी / कागल
शासनाने आमच्या दुधगंगा नदीचे पाणी इचलकरंजी शहराला देण्याचा विचार बदलावा. अन्यथा आम्ही अन्यायग्रस्त धरणग्रस्त बांधव रस्त्यावर उतरुन शासनाला त्यांना पाणी देण्याचा विचार बदलेपर्यंत आंदोलन करत राहू, या काळात इत्यादी अप्रिय घटना घडल्यास याची जबाबदारी शासनाची राहील,अशा प्रकारचे निवेदन धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष बाबुराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, आम्ही धरणग्रस्त दुधगंगा प्रकल्पात विस्थापित होऊन, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमच्या दुधगंगा प्रकल्पातील २९ वसाहती वसलेल्या आहेत. त्यातील १० वसाहती कागल तालुक्यामध्ये वसवलेल्या आहेत. जनतेच्या कल्याणासाठी, जिल्हा हरीत होण्यासाठी आणि विस्थापीत झालेली आमची घरे दारे, शेती जमिनी, भुमी, आमची दैवते सोडून छातीवर दगड ठेवून डोळ्यात अश्रु दाटून आम्ही केवळ जनहितासाठी विस्थापीत झालो आहोत. इतके दुःख पचवत आम्ही धरणग्रस्त कागल मुक्कामी आलो.
कागल तालुक्यातील दुधगंगा नदी ही आमच्या गावी तिचा उगम झाला व पुन्हा त्याच नदिचे पाणी आम्ही पित आहोत. हे आमचे मोठे भाग्य आहे. ही नदी जीवनदायीनी आहे. या नदीच्या पाण्यावर अनेक गावे जगत आहेत, आपला उदरनिर्वाह करत आहेत. या पाण्यावर शेतीचे भुक भागवली जात आहे. जिल्ह्यातील औद्योगिक कारणासाठी ही दुधगंगा नदी धावलेली आहे. परिणामी सध्या दुधगंगा नदीतून कागल तालुक्यासाठी अल्प पाणीसाठा आहे. त्यावर कागल तालुक्याचे गुजरण सुरु आहे. असे असताना शासनाने मात्र आमच्या नदीतील शिल्लक पाणी इचलकरंजी शहराला देण्याचा घाट घातला आहे.
हा आम्हा धरणग्रस्तांच्यावर मोठा अन्याय आहे. आम्ही मन मोठे करुन विस्थापित झालो. आमचा सर्व त्यागाचा विचार करून कागल तालुक्यातील प्रामाणिक लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी आम्हांस मिळाल्या. काही बागायत व कांही माळभाग जमिन आम्हांस मिळालेने पाणी सुध्दा शेतीला येथील शेतकऱ्यांनी आम्हाला दिले. व तालुक्यातील लोकांनी आम्हाला जगवण्याचा प्रयत्न केला. पहिली १० वर्षे आम्ही कोठे येवून पडलो आहोत. याचा त्रास आम्हाला होत होता. पण नंतर आम्ही धरणग्रस्त कागल तालुका वासीय म्हणून वावर करु लागलो. हे सर्व श्रेय कै.विक्रमसिंह घाटगे व कै.सदाशिवराव मंडलिक यांना जाते. या दोन उभय नेत्यांनी धरणग्रस्त हे आपले घरचे असले प्रमाणे त्यांनी कोणताही विचार न करत शासन दरबारी आमचे प्रश्न मांडून खऱ्या अर्थाने सम्हा आम्ही धरणग्रस्तांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. या दोन नेत्यांचे उपकार आम्ही धरणग्रस्त कधीही विसरणार नाही.
परंतु आजचे राजकारण वेगळ्या परिस्थितीवर जात आहे. शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांच्यावर सहा तालुक्यातील शेतकरी असतील किंवा नेते मंडळी असतील यांनी या प्रश्नाबाबत पुढाकार घेवून शासन दरबारी नेतृत्व करावे, अशी मुभा दिलेली आहे. हि त्यांनी स्विकारावी अशी आम्हा धरणग्रस्तांची विनंती आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष बाबुराव पाटील, विठ्ठल चव्हाण, प्रकाश राणे, विठ्ठल पाटील, श्रावण पाटील, मारुती यादव, विष्णू साऊळ, सागर माने आदींच्या सह्या आहेत.
Previous Articleशिरोळ पंचायत समिती सभापतींवरअविश्वास ठरावाच्या हालचाली सुरु
Next Article रशियात कोरोनाबाधितांची संख्या 7 लाखांवर
Related Posts
Add A Comment