प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र परराज्यांमधून येणाऱया नागरिकांची संख्या वाढत चालली असून त्यांना सरकारी संस्थेत व होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. होम क्वारंटाईन असलेले नागरिक सर्वत्र फिरत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी बजावला आहे.
कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याबाबत सूचना करण्याकरिता महापालिका आयुक्तांनी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचाऱयांची बैठक मंगळवारी घेतली. यावेळी क्वारंटाईन असलेल्या नागरिकांवर कडक नजर ठेवण्याची सूचना केली. होम क्वारंटाईन असलेले नागरिक बाजारपेठेत तसेच इतरत्र फिरत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून होत आहेत. अशा क्वारंटाईन नागरिकांवर लक्ष ठेवण्याची सूचना देऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असा आदेश बजावला. कोविड-19 ची चाचणी केल्यानंतर निगेटिव्ह अहवाल आला असल्यास अशा नागरिकांना सरकारी संस्थेत क्वारंटाईन ठेवण्याऐवजी होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. पण हे नागरिक इतरत्र फिरताना दिसत आहेत. त्यामुळे असे नागरिक फिरताना आढळल्यास किंवा घरी उपस्थित नसल्यास त्यांना सरकारी संस्थेत क्वारंटाईन करण्याची सूचना महसूल विभागाच्या कर्मचाऱयांना महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी केली. परराज्यांतून येणाऱया नागरिकांवर नजर ठेवावी, क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची दररोज हजेरी घ्यावी, अशा सूचना केल्या. खोटा पत्ता देऊन शहरात दाखल झालेल्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा आदेश बजावला आहे.
महसूल वसुलीसाठी प्रयत्न करा
कोरोनाबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवेळी कामकाजाचा आढावा आयुक्तांनी घेतला. क्वारंटाईनव्यतिरिक्त महसूल विभागाच्या कामकाजाकडेही लक्ष द्या. महसूल वसुलीसाठी आवश्यक प्रयत्न करा, अशा सूचना आयुक्तांनी केल्या. अनधिकृत लेआऊटमध्ये बांधण्यात आलेल्या बॉण्डपेपरवर खरेदी केलेल्या जागेतील घरांना कर बसवू नये, तसेच त्यांना उतारा देण्यात येऊ नये. जर उतारा देण्यात आल्याचे निदर्शनास आल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा आयुक्तांनी महसूल निरीक्षक आणि बिल कलेक्टरना दिला.