आपची जोरदार टीका : इमारतींच्या रंगरंगोटीत लाखोंच्या भ्रष्टाचाराचा केला पर्दाफाश
प्रतिनिधी /पणजी
इफ्फी अर्थात ’इंटरनॅशनल फिल्म पॅस्टिवल ऑफ इंडिया’ हा सध्या भाजपसाठी ’इंटरनल फिक्सिंग पॅस्टिवल’ बनलेला आहे, अशी जोरदार टीका आम आदमी पार्टीने केली आहे.
पक्षाचे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक आणि ताळगाव मतदारसंघ प्रमुख सेसिल रॉड्रिग्स यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह बुधवारी मनोरंजन सोसायटी परिसरात आंदोलन करून भाजपच्या आंचिम भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केला. सदर प्रकरणी 24 तासांच्या आत चौकशी करण्यात यावी, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे धरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
आंचिमनिमित्त दरवर्षी राजधानीतील ठराविक इमारतींची रंगरंगोटी करण्यात येते. त्यावर लाखो रुपये खर्च करण्यात येतात. यंदा साबांखातर्फे 70 लाख रुपयांची निविदा जारी केली होती. मंगळवारी दुपारी 3 वाजता निविदा खोलून बुधवारी सकाळी 11 वाजता पात्र कंत्राटदारास काम बहाल करणे क्रमप्राप्त होते. परंतु आश्चर्यकारक प्रकार म्हणजे तत्पूर्वीच अंतर्गत व्यवहार (इंटरनल फिक्सिंग) होऊन इमारतींची रंगरंगोटी पूर्णही करण्यात आली आहे. त्यामुळे अशा निविदांना अर्थ तो काय राहतो, असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला.
सदर प्रकरणी आंचिमचे प्रमुख आयोजक मनोरंजन सोसायटीचे उपाध्यक्ष तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कोणतीही कल्पना नसावी याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले असून साबांखाने जारी केलेली निविदा रद्द करावी अशी मागणी आपने केली आहे.
दरम्यान, सदर प्रकरणी साबांखाकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे आश्वासन मनोरंजन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तारीक थॉमस यांनी दिले असल्याची माहिती सेसिल रॉड्रिगीश यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना दिली. मात्र अशी आश्वासने देणाऱया भाजपच्या कोणत्याही अधिकाऱयावर आमचा विश्वास नसल्याचे त्या म्हणाल्या.
सरकारचे कायदे नियम हे केवळ सर्वसामान्य लोकांसाठी असतात. सरकार हवे तसे कायदे वळवून स्वमर्जीने निर्णय घेते. त्यातूनच आंचिमच्या नावाने लाखोंचा भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचा दावा त्यांनी केला. याप्रकरणी आतापर्यंत विविध अधिकाऱयांच्या भेटी घेऊन सदर भ्रष्टाचाराचे प्रकरण त्यांच्या कानी घातले आहे. परंतु अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचे आपचे सहचिटणीस सुनिल सिग्नापूरकर यांनी सांगितले.