वृत्तसंस्था/ मेलबर्न
2021 अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेतील विजेती महिला टेनिसपटू इमा रॅडूकनूने मेलबोर्नमध्ये होणाऱया सरावाच्या टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेपूर्वीची ही सरावाची स्पर्धा घेतली जात आहे.
ब्रिटनच्या इमा रॅडूकनू हिने अबु धाबीत 16 ते 18 डिसेंबर दरम्यान झालेल्या प्रदर्शनीय टेनिस स्पर्धेतून कोरोना समस्येमुळे माघार घेतली होती. इमा रॅडूकनू ही कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळल्याने तिला काही दिवसांसाठी विलगीकरणामध्ये ठेवण्यात आले होते. विलगीकरणातील कालावधीत नुकताच संपला आहे. मेलबर्नमधील सरावाची टेनिस स्पर्धा 3 ते 9 जानेवारी दरम्यान खेळविली जात आहे. आता 19 वर्षीय रॅडूकनूचे लक्ष आगामी ऑस्ट्रेलियन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेवर आहे. ही स्पर्धा 17 जानेवारीपासून सुरू होणार आहे.