अल्टीअस, सुप्रीम स्मार्ट, ईव्हीट्रिककडून ई-दुचाकी सादर – दिल्लीत आयोजन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्ली येथील प्रगती मैदानावर 11 व्या इलेक्ट्रिक वाहन एक्स्पो 2021(ईव्ही वाहन प्रदर्शन) प्रदर्शनाला प्रारंभ झाला आहे. सदरच्या प्रदर्शनामध्ये जवळपास 80 कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. ज्यामध्ये जास्तीत जास्त कंपन्या या बॅटरीचा व्यवसाय करणाऱया आहेत. यासोबतच दुचाकी, तीन चाकी यांच्याशी संबंधीत अनेक कंपन्या प्रदर्शनात सहभागी झाल्या आहेत.
प्रदर्शनातील निवडक कंपन्या
अल्टीअस कंपनीची ई-दुचाकी ः
अल्टीअसने दोन घरगुती ई दुचाकी आणि एक ई-स्कूटर सादर केल्या आहेत. एका चार्जिंगवर जवळपास 140 ते 150 किलोमीटरचे अंतर कापता येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. प्रारंभीची किमत ही जवळपास 48 हजार रुपये आहे. सबसिडीसोबत स्कूटरची किमत ही 35,000 रुपये होत असल्याची माहिती आहे.
सुप्रीम स्मार्ट पॉवर लिमिटेड
सदरची कंपनी दोन ई-बाईक घेऊन आली आहे. यामध्ये हेलिओस आणि एयोलोस या दोन दुचाकींचा समावेश आहे. जवळपास एक सारखीच फिचर्स आणि स्पेसिफिकेशन असली तरी डिझाईनमध्ये थोडासा बदल आहे. दोन्ही दुचाकीत लिथियम बॅटरी समाविष्ट आहे. यामध्ये रिव्हर्स गिअर आणि क्रूज कंट्रोल यासारखे अत्याधुनिक फिचर्स मिळण्यासोबत एका चार्जवर जवळपास 70 किमीचा टप्पा गाठण्याची क्षमता गाडीत आहे.
ईवीट्रिक मोर्ट्स
पुण्यातील इलेक्ट्रिक वाहन स्टार्टअप कंपनी ईवीट्रिक मोटर्सचा या प्रदर्शनात सहभाग आहे. यामध्ये कंपनीने दोन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत. यात ऍक्सेस आणि राइड आहे. साधारणपणे 64,994 रुपये किमत आणि राइडची किमत 67,996 रुपये आहे. प्रारंभी सात शहरांमध्ये विक्री करण्यात येणार असून यात दिल्ली, गुडगांव, पुणे, औरंगाबाद, बेंगळूर, तिरुपती आणि हैदराबाद या शहरात विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.दोन्ही स्कूटरमध्ये लिथियम आयर्न बॅटरी मिळणार आहे. 3.5 तासात बॅटरी पूर्ण चार्ज होणार असून स्कूटर 75 किलोमीटर धावणार आहे.
टेरा मोर्ट्स कॉर्पोरेशन
जपानची कंपनी टेरा मोर्ट्सने प्रदर्शनात आपली इलेक्ट्रिक दुचाकी सादर केली आहे. या दुचाकीचा टॉप स्पीड 100 किमी प्रती तास राहणार आहे. दुचाकीत 9.6 केडल्ब्यूची डीसी मोटर मिळणार आहे.