ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंजाब नॅशनल बँकेचे 14 हजार कोटींचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीची लंडन, संयुक्त अरब अमिराती आणि मुंबईमधील 329.66 कोटींची संपत्ती सक्तवसुली संचलनालयाने आज जप्त केली.
सक्तवसुली संचलनालयाने जप्त केलेल्या संपत्तीत मुंबईच्या वरळी येथील समुद्र महाल इमारतीतील चार फ्लॅट, अलिबागमधील जमीन, समुद्राजवळचे फार्महाऊस, जैसलमेरमधील पवनचक्की, लंडनमधील फ्लॅट आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) मधील निवासी फ्लॅट्स यांचा समावेश आहे. तसेच या जप्तीमध्ये बँकेतील हिस्सा आणि ठेवींचाही समावेश आहे.
पंजाब नॅशनल बँक कर्ज घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी नीरव लंडनच्या वंडसवर्थ तुरुंगात कैद आहे. गेल्या महिन्यात लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टाने नीरव मोदीला 9 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्याचा आदेश दिला आहे. 7 सप्टेंबरला त्याच्यावर कोर्टात सुनावणी होणार आहे.