ऑनलाईन टीम / मुंबई :
शिवसैनिकांनी मुंबईतील ईडी कार्यालयासमोरच ‘भाजप प्रदेश कार्यालय’ म्हणून बँनर लावले आहेत. सेना भवनसमोर महिला शिवसैनिकांची ईडी व भाजपच्या विरोधात घोषणाबाजी केली. संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स पाठवल्यानंतर शिवसैनिक आता आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात भाजप विरुद्ध शिवसेना लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
एकीकडे संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुरू असताना शिवसैनिकांनी मुंबईतल्या ईडी कार्यालयाबाहेर बॅनरबाजी केली. ईडी कार्यालयाबाहेर ‘भाजप प्रदेश कार्यालय’ असे पोस्टर लावून शिवसेनेने कृतीतून भाजप तसेच ईडीला टोला हाणला आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ही पत्रकार परिषद घेऊन भाजपवर टीका केली आहे. आपल्या पत्नीला आलेल्या नोटिसीवर प्रतिक्रिया देताना ‘ईडी हा भाजपचा पोपट’ असल्याचा घणाघात राऊत यांनी यावेळी केला.