क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
हिरो इंडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत आज शुक्रवारी वास्को येथील टिळक मैदानावर मुंबई सिटी एफसीची लढत ईस्ट बंगालशी होणार आहे. सध्या 11 सामन्यांतील 26 गुणांनी मुंबई सिटी एफसी पहिल्या तर ईस्ट बंगालचे 12 सामन्यांतून 12 गुण झाले आहेत.
या लढतीसाठी खेळाडूंना प्रेरीत करण्यासाठी ईस्ट बंगालचे प्रशिक्षक रॉबी फाऊलर यांना फारसे प्रयास पडणार नाहीत. त्यांच्यासाठी बाद फेरीतील स्थान पणास लागले आहे. मुंबई सिटीविरूद्धचा सामना जिंकल्यास बाद फेरीतील संधीसाठी पुढील सामन्यात आणखी एका विजयाची गरज अशी स्थिती त्यांना निर्माण करता येईल. त्यांच्याबाबतील अशी स्थिती निर्माण होईल अशी चिन्हे मोसमाच्या प्रारंभी मात्र दिसली नव्हती.
ईस्ट बंगालची वाटचाल कागदावरील समीकरणानुसार दिसते तेवढी सोपी नाही. याचं कारण मुंबई सिटी संघ सध्या पहिल्या स्थानावर आहे. ईस्ट बंगालने अप्रतिम कामगिरीच्या बळावर स्पर्धेतील मोहिमेचे पारडे फिरविले आहे. आता गेल्या सात सामन्यांत ते अपराजित आहेत. मुंबई सिटीविरूद्ध याआधी झालेल्या लढतीच्या तुलनेत त्यांच्यासमोर जास्त खडतर आव्हान असेल.

मुंबईचा संघ बलाढय़ असल्याचे ईस्ट बंगालचे सहाय्यक प्रशिक्षक रेनेडी सिंग म्हणाले. त्यांची कामगिरी फार चांगली होत आहे, पण आपल्याला आमच्या शैलीचा आणि गेल्या सात सामन्यांतील आमच्या खेळाचा विचार करावा लागेल. आमच्या खेळाडूंनी खरोखरच फार कसून प्रयत्न केले. ही एक प्रक्रिया असते आणि ती आम्हाला कायम ठेवावी लागेल, असे रेनेडी सिंग म्हणाले.
ब्राईन एनोबाखरे याच्या आगमनामुळे ईस्ट बंगालच्या आक्रमणात भेदकता निर्माण झाली आहे, पण बचावफळीतील प्रश्न कायम आहेत. दुसऱया सत्रात त्यांना 13 गोल पत्करावे लागले आहेत. याशिवाय अखेरच्या पंधरा मिनिटांमधील गोलांची संख्या पाच आहे.