क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
सातव्या हिरो इsडियन सुपरलीग फुटबॉल स्पर्धेत आज शुक्रवारी वास्कोच्या टिळक मैदानावर हैदराबाद एफसीची लढत एससी ईस्ट बंगालविरूद्ध होईल. हैदराबादचे 16 सामन्यांतून पाच विजय, आठ बरोबरी व तीन पराभवाने 23 गुण झाले असून ते चौथ्या स्थानावर आहेत. एससी ईस्ट बंगालचे 16 सामन्यांतून तीन विजय, सात बरोबरी व सहा पराभवाने 16 गुण आहेत.
ईस्ट बंगालचे आयएसएलमधील पदार्पण अडखळत झाले. बहुतांश मोसमात त्यांना तळात राहावे लागले. यानंतरही त्यांच्या सर्व आशा संपुष्टात आलेल्या नाहीत. चौथ्या स्थानावरील हैदराबाद एफसीला पराभूत केले तर ते प्रतिस्पर्ध्याविरूद्धची पिछाडी चार गुणांपर्यंत कमी करू शकतील. त्यांचे तीन सामने बाकी असतील. त्यादृष्टिने या लढतीसह चार सामने त्यांच्यासाठी अंतिम फेरीइतके महत्वाचे आहेत.
ईस्ट बंगालने 16 सामन्यांतून 16 गुणांची कमाई केली आहे. नॉर्थईस्ट युनायटेड एफसी, हैदराबाद एफसी आणि एफसी गोवा या तीन संघांच्या संधीला धक्का बसावा म्हणून त्यांना इतर संघांवर अवलंबवून राहावे लागेल. या तिन्ही संघांची 16 सामन्यांतून 23 गुण अशी समान कामगिरी आहे. ईस्ट बंगालसाठी मोहिम संपलेली नाही. हैदराबाद एफसीनंतर एटीके मोहन बागान, नॉर्थईस्ट युनायटेड एफसी आणि तळातील ओदिशा एफसी हे त्यांचे त्यानंतरचे तीन प्रतिस्पर्धी आहेत.
सहाय्यक प्रशिक्षक टोनी ग्रँट यांच्यासाठी शुक्रवारची लढत सर्वांत खडतर कसोटी असेल. इतर बहुतांश क्लबपेक्षा मी हैदराबादला वरचे स्थान देतो. गेल्या दोन मोसमांच्या तुलनेत त्यांचा संघ सरस असल्याचे ग्रँट म्हणाले. त्यांच्याकडे काही चांगले खेळाडू आहेत. हा सामना खडतर असेल. ते आमच्यापेक्षा काही गुणांनी पुढे आहेत, असे ग्रँट यावेळी म्हणाले.
हैदराबाद एफसीविरूद्धच्या सामन्यात काही कमाई करायची असेल तर ईस्ट बंगालला आक्रमणाच्या निर्णायक टप्प्यात सर्वोत्तम क्षमता पणास लावावी लागेल.
मैदानी खेळातून सर्वांत कमी सात गोल त्यांचे आहेत. त्यांचा तारणहार ठरलेल्या ब्राईट एनोबाखरे याची कामगिरी चमकदार प्रारंभानंतर ढेपाळली आहे. जमशेदपूरविरूद्धचा सामना ईस्ट बंगालसाठी सर्वोत्तम ठरला. जवळपास तेच अकरा खेळाडू घेऊन सुरूवात करण्यास पसंती असल्याचे ग्रँट म्हणाले. दुसरीकडे हैदराबादचे प्रशिक्षक मान्यूएल मार्क्वेझ यांना विजय मिळाल्यास ते बाद फेरीच्या दिशेने मोठे पाऊल ठरेल याची कल्पना आहे. त्यांनी क्लबबरोबरील करार नुकताच वाढविला आहे. त्यांचा संघ आठ सामन्यांत अपराजित आहे. हा सामना आमच्यासाठी अवघड असेल. त्यांनी बरेच खेळाडू बदलले आहेत असे वाटते, पण आम्ही जिंकायचा प्रयत्न करू. आम्ही सर्व सामने जिंकले तर पहिल्या चार संघांत राहू. स्पर्धेचा लीगचा अंतिम टप्पा नजिक आला आहे, यासाठी आम्हाला गुण जिंकण्यासाठी प्रयत्न करावा लागेल, असे मार्क्वेझ म्हणाले.