वार्ताहर/ उचगाव
कोविड-19 महामारी कोरोनाच्या काळात डॉक्टरांची भूमिकाही महत्त्वाची असते. रुग्णांच्या मनावर कोणतेही पडपन, धक्का न पोचविता त्यांना तपासून उपचार करून बरे करणे व आपले आरोग्य धोक्यात असताना देखील न डगमगता या कोरोना आजाराशी सामना करणारी डॉक्टर मंडळी महत्त्वाची आहेत. अशांचा सन्मान करणे महत्त्वाचे असल्याचे मत मुख्याध्यापक एन. ओ. चौगुले यांनी व्यक्त केले.
उचगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने उचगावमधील डॉक्टर कोरोना योद्धय़ांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी एन. ओ. चौगुले बोलत होते.
प्रारंभी गणेशमूर्तीचे पूजन सागर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. मोहन पावशे, डॉ. प्रविण देसाई, डॉ. वामन कदम, पवन देसाई, या कोरोना योद्धय़ांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष बाबाजी पावशे, उपाध्यक्ष विठ्ठल पावशे, संजय पावशे, विनोद कोळी, जोतिबा चौगुले, देवेंद्र कोळी, जी. के. तुप्पट, तानाजी पावशे, अशोक पावशे यासह मान्यवर मंडळी उपस्थित होती. सूत्रसंचालन एन. ओ. चौगुले यांनी केले तर बाळू पावशे यांनी आभार मानले.