ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील 24 तासात तर 2 हजार पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी तब्बल 2,402 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ॲक्टिव्ह रुग्णांनी 13 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. कालच्या दिवसात 1,080 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 30,542 नमुने निगेटिव्ह आले. प्रदेशातील एकूण संख्या 1 लाख 18 हजार 646 इतकी झाली आहे. त्यातील 1 लाख 857 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
प्रदेशात उपचारा दरम्यान, आतापर्यंत 1819 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर 13 हजार 546 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देहरादून, हरिद्वार, नैनिताल आणि उधमसिंह नगरमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान, प्रदेशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी झाले असून 85.1 % इतके झाले आहे. तर प्रदेशातील कन्टोनमेंट झोनची संख्या देखील 74 झाली आहे.