ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत कालच्या दिवशी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या सर्वात कमी आहे. मागील 24 तासात 4 रुग्णांचा बळी गेला. तर 424 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे उत्तराखंडातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 77 हजार 997 वर पोहोचला आहे. तर त्यातील 70,634 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंडात रविवारी 14,909 नमुन्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. देहरादून जिल्ह्यात सर्वात अधिक म्हणजेच 171, हरिद्वारमध्ये 59, नैनिताल 40, पौंडी 28, पिथोरगड 28, उधम सिंह नगर 20, चमोली 19, टिहरी 16, रूद्रप्रयाग 13, चंपावत 3, उत्तरकाशी, अल्मोडा आणि बागेश्र्वरमध्ये प्रत्येकी 9 जणांचा समावेश आहे. तर आतापर्यंत 1285 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या दिवशी 346 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आता पर्यंत 70, 634 जणांना घरी सोडण्यात आले आहे. सद्य स्थितीत 5,223 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रदेशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.56% तर संसर्गाचे प्रमाण 5.48 % इतके आहे.