- आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा
ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आता विविध राजकीय पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आज उत्तराखंडमध्ये पोहचले असून तेथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यानी मोठय़ा घोषणा केल्या आहेत. ते म्हणाले, मी गर्वाने जाहीर करू इच्छित आहे की, आगामी निवडणुकीत आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार हे कर्नल अजय कोटियाल असतील. आणि आम्ही उत्तराखंडला संपूर्ण जगासाठी आध्यात्मिक राजधानी बनवू, अशी दुसरी घोषणा केली आहे.
पुढे ते म्हणाले, काही दिवसांपूर्वी मनिष सिसोदिया देहरादूनमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी कोण उमेदवार असले पाहीजे? कसा असावा याबाबत नागरिकांची मते जाणून घेतली होती. त्यावर लोकांनी सांगितले की आता आम्हाला देशभक्त फौजी हवा आहे. आणि ते दुसरे – तिसरे कोणी नको असून आम्हांला कर्नल अजय कोटियालच उमेदवार पाहीजे असे सांगितले होते. त्यामुळे कर्नल कोटियाल यांचे नाव मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारासाठी निश्चित करण्यात आले. हा निर्णय उत्तराखंडच्या लोकांनी घेतला आहे. अजय कोटियाल यांनी सैन्यात राहून देशाची सेवा केली आहे. जेव्हा उत्तराखंडचे काही नेते येथील लोकांना लुटत होते, तेव्हा कोटियाल हे सीमेवर देशाचे रक्षण करत होते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे ते म्हणाले, उत्तराखंडला आम्ही देवभूमी म्हणतो, या ठिकाणी हिंदुंची अनेक तीर्थस्थळं आहेत, जगभरातून या ठिकाणी हिंदू येतात. त्यांच्यासोबत मिळून आम्ही उत्तराखंडला संपूर्ण जगासाठी आध्यात्मकि राजधानी बनवू. यामुळे तरूणांना रोजगार देखील मिळतील. असेही केजरीवाल यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.
कर्नल कोटियाल म्हणाले …
उमेदवार पदासाठी घोषणा केल्यावर कर्नल कोटियाल म्हणाले की, अरविंद केजरीवाल माझ्यावर जी जबाबदारी देत आहेत, ते माझ्यासाठी सोपे काम नाही आहे. पण मी बरीच चॅलेंज पाहिली आहेत. फौजेत असताना दुष्मनांसमोर जावून त्यांच्याशी दोन हात केले आहेत. येथील प्रंट लाईन राजकीय क्षेत्र आहे. पण मी काही नेता नाही मला राजकारण फार कळत देखील नाही. पण मी केजरीवाल सरकारचे मॉडेल पाहिले आणि त्यांना फॉलो करण्यास सुरूवात केली. तरूणांना रोजगार देणे हे केजरीवाल यांचा मेन फोकस आहे. लवकरच या संदर्भात आम्ही काम सुरू करून रोजगार देण्यावर भर देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.