ऑनलाईन टीम/तरुण भारत
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यातील मतदान आज गुरुवारी होत असून यासाठी प्रशासन सज्ज आहे. बुधवारी गाझियाबाद येथील मतदान केंद्रावर मतदान अधिकारी दाखल होत तयारी केली. आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली असून मतदान केंद्रावरील गर्दीवरून मतदार मतदानासाठी बाहेर पडत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला आज दि. १० फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आहे. राज्याच्या पश्चिम भागाच्या ११ जिल्ह्यांतील ५८ मतदारसंघात मतदान होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली. तर या ५८ मतदारसंघातील प्रचार बुधवारी थंडावला.
आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली असून करोनाच्या पार्श्वभूमीवर काही मार्गदर्शक तत्त्वे राबवण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश सरकारमधील श्रीकांत शर्मा, सुरेश राणा, संदीप सिंह, कपिलदेव अगरवाल, अतुल गर्ग आणि चौधरी लक्ष्मी नारायण हे मंत्री पहिल्या टप्प्यात प्रमुख उमेदवार आहेत. या ५८ मतदारसंघात एकूण ६२३ उमेदवार आपले राजकीय भविष्य आजमावत असून दोन कोटी २७ लाख मतदार आहेत. २०१७च्या विधानसभा निवडणुकीत या ५८ मतदारसंघांपैकी ५३ जागा भाजपने जिंकल्या होत्या, तर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने प्रत्येकी दोन जागा मिळवल्या, तर एका जागेवर राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवाराचा विजय झाला होता.
उत्तर प्रदेशातील मेरठ येथील 7 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली असून येथे 26 लाख मतदान आहे. मतदारांचा उत्साह सकाळपासून मतदान केंद्रावर पाहायला मिळत आहे. तर, पोलिसांनीही कडक बंदोबस्त ठेवला आहे. अनेक मतदारसंघातील केंद्रावर उमेदवार मंडळीही हजर झाली असून माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करुन नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केलं आहे. दरम्यान, मतदान शांततेत सुरू असतानाच मथुरा आणि मुझफ्फरनगर येथील केंद्रावर ईव्हीएम बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे.
थुरा येथील बलदेव विधानसभा क्षेत्रातील फरह येथे ईव्हीएम मशिन खराब झाले आहे. येथील बुथ क्रमांक 442 वर ईव्हीएम मशिन खराब झाल्याने मतदान प्रक्रिया थांबली आहे. त्यामुळे, मतदारांची केंद्राबाहेर मोठी रांग लागली आहे. दरम्यान, यापूर्वी मुजफ्फरनगरच्या इस्लामिया इंटर कॉलेज पोलींग बुथावरही ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच माहिती समोर आली आहे.
दरम्यान, सर्व मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली आहे. काही केंद्रावरुन मतदान यंत्रात बिघाड असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. आम्ही तेथील मतदान यंत्र बदलून देत अडचण दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. सगळीकडे शांततेत मतदान सुरू आहे, असे शामली जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी जसजीत कौर यांनी म्हटले आहे.
