अर्ज माघारीसाठी गुरुवारी शेवटचा दिवस : ठरणार वैद्य-अवैध अर्ज

बेळगाव / प्रतिनिधी
महापालिकेच्या 58 वॉर्डांकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी तोबा गर्दी झाली होती. सोमवारी सायंकाळपर्यंत अनेक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवार दि. 24 रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून यापैकी वैध अर्ज किती? हे समजणार आहे. गुरुवार दि. 26 रोजी अर्ज माघारीसाठी शेवटचा दिवस असणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. सर्वजण निवडणूक लढविण्याकरिता तयारी करत आहेत. काही ठिकाणी उमेदवारी अर्जांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. गल्लीतील पंचमंडळी, विविध संघटना आदींच्या बैठका घेऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच उमेदवारी अर्ज माघारीसाठी काहींनी दबावतंत्राचा प्रयत्न चालविला आहे. काहींनी तडजोड करण्यासाठी धावपळ चालविली आहे. अर्ज भरण्यासाठी झालेली गर्दी पाहता बहुरंगी लढत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अशातच काँग्रेस आणि भाजपने चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून उमेदवारांची यादी रविवारी सायंकाळी प्रसिद्ध केली होती. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या उमेदवारांबरोबरच मराठी भाषिक उमेदवार आणि अपक्ष उमेदवार निवडणूक लढविण्याची शक्मयता आहे. वॉर्ड पुनर्रचनेमुळे गेंधळ निर्माण झाला असून विजयाबद्दल ठामपणे सांगणे अशक्मय आहे. मात्र निवडणूक मतदारसंघांचा अभ्यास केलेले काही उमेदवार आपणच विजयी होणार, असे सांगत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आठ दिवसांचा वेळ देण्यात आला होता. पण त्यामध्येही मोहरम आणि रविवार असे दोन दिवस सुटी झाली. परिणामी उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाही. अर्जासोबत जोडण्यात येणाऱया कागदपत्रांबाबतही संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे शनिवारपर्यंत 41 वॉर्डमध्ये 85 जणांनी अर्ज दाखल केले होते. 17 वॉर्डमध्ये एकही अर्ज दाखल झाला नव्हता. त्यामुळे सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी झाली होती. मंगळवार दि. 24 रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, वैध व अवैध अर्ज किती हे स्पष्ट होणार आहे. तसेच गुरुवार दि. 26 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतरच निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या स्पष्ट होणार आहे.