आग विझविण्यास 3 बंबचा वापर : अग्निशमन दलाचे अथक प्रयत्न
प्रतिनिधी / म्हापसा
उसकई पालये येथे असलेल्या पावस्कर इंडस्ट्रीज या बॅनर ऍण्ड एक्वेरीक सीट बनविणाऱया कंपनीला शुक्रवारी दुपारी आग लागून या आगीत इंडस्ट्रीमधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज असून या आगीत 75 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे कंपनीचे मालक पावस्कर यांनी सांगितले. दरम्यान आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून नेमके या मागे काय कारण असावे अशी विचारणा करणारे लेखीपत्र म्हापसा अग्निशमन दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव यांनी वीज खात्याला पाठविले आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार उसकई& पालये येथे पावस्कर यांच्या मालकीची एक्वेरीक सीट बनविणारी कंपनी असून या कंपनीत काम करणारे रामकृष्ण दाभाळे दररोजच्या प्रमाणे दुपारी भोजन करण्यासाठी दरवाजा बंद करून घरी गेले असता दीड वाजण्याच्या दरम्यान या कंपनीमधून बाहेर धूर येऊ लागला. हळूहळू आगीने पेट घेतला असता आग मोठय़ा प्रमाणात भडकली. आतमध्ये असलेल्या फायबरला आग लागल्याने ती विझविणे नियंत्रणाबाहेर होते. घटनेची माहिती म्हापसा अग्निशमन दलास दिल्यावर अवघ्या दहा मिनीटाच्या कालावधीत बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र दुपारच्यावेळी कंपनीने पेट घेतला व वाऱयाने आग भराभरा सर्वत्र पेटल्याने कंपनीत असलेल्या मशीन आदी सामानाने मोठय़ा प्रमाणात पेट घेतला. आद नियंत्रणाक येणे कठीण असल्याचे समजल्यावर म्हापशाहून अन्य दोन बंबची मागणी करण्यात आली.

अग्निशमन दलाच्या जवानांची धावपळ
दलाचेअधिकारी बॉस्को फेर्राव यांच्या नेतृत्वाखाली उपअधिकारी ज्ञानेश्वर सावंत, इप्रिनो डायस, शाहीद खान, हितेश परब, सुभाष माजिक, गिरीश गांवस, दत्तराज च्यारी, विष्णू नाईक, भगवान पाळणी यांनी घटनास्थळी धाव घेतली व आगीश झुंझ देत 3 तासाच्या कालावधीनंतर आग आटोक्यात आणण्यास यश मिळविले. ही आग विझविण्यासाठी स्थानिकांनीही घरातील पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आगीचा रुद्रावतार पाहून तेही माघारी फिरले.
सर्व साहित्य जळून खाक
या आगीत पावस्कर इंडस्ट्रीज यांच्या मालकाचे ऑफीस पॅबिन, ग्राईंडींग मशीन, कटींग मशीन, वीज यंत्रणा, पॉलिमेट, रॉ-मटेरीयल, छप्पर, इलेक्ट्रीक यंत्रणा इंडस्ट्रीज घर आदी सामान पूर्णपणे जळून खाक झाले. यात 75 लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज पावस्कर इंडस्ट्रीज कंपनीचे मालक श्री. पावस्कर यांनी व्यक्त केले आहे. आतमधील सर्व साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले.
बस्तोडाचे सरपंच रणजीत उजगांवकर यांनीही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यांनी अग्निशमन दल तसेच पोलिसांचे आभार मानले. येथे जिवीतहानी झाली नाही. आग आटोक्यात आली असे ते म्हणाले. त्यांनी बॉस्को फेर्राव व पथकाचे आभार मानले.
आगीचे कारण अद्याप अस्पष्टच– बॉस्को फेर्राव
म्हापसा अग्निशमन दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव म्हणाले की पावस्कर कपंनीच्या मालकानीया आगीत आपले 75 लाखाचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. प्रथमदर्शनी हा शॉर्टसर्कीटचा प्रकार असावा असे आढळून आले असले तरी आम्ही वीज खात्याला नेमकी आग कशी लागली याचा पंचनामा करण्यासाठी लेखीपत्र पाठविले असल्याचे श्री. फेर्राव यांनी सांगितले. ही आग विझविण्यासाठी 3 बंबचा वापर करण्यात आला. दलाच्या जवानांनी आग पूर्णपणे विझविण्यास 3 तासांची आगीशी झझ दिली.