प्रतिनिधी / इचलकरंजी
जुना चंदूर रोडलगत 20 एकर उसाच्या शेताला आग लागून ऊस जाळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी घडली. निम्या इचलकरंजी शहराला वीजपुरवठा करणारी विद्युत तार तुटल्याने शॉर्टसर्किटने आगीचा मोठा भडका उडाला. नगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे बंब आल्यानंतर आग आटोक्यात आणली. यात सुदैवाने जीवितहानी टळली मात्र एकूण बारा शेतकऱ्यांचे सुमारे 30 लाखांचे नुकसान झाले आहे.
शहरातील जुन्या हुपरी मार्गावर रामचंद्र सुर्वे यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू होती. सुर्वे यांच्या शेतातून 33 केव्ही विद्युत पुरवठा करणारी विद्युत तार सबस्टेशनकडे गेली आहे. यंत्राद्वारे ऊस तोडणी सुरू असताना अचानक ही तार तुटून मोठी ठिणगी पडल्याने उसाच्या फडाला आग लागली. मात्र विद्युत प्रवाहाचा जोर, उन्हाचा तडाका,चौफेर उसाची शेती आणि वारे यामुळे आगीचा जोरात भडका उडाला. आगीने सभोवतालची सर्व ऊस शेती गिळंकृत केली.सुमारे दोन किमी अंतरापर्यंतच्या उसापर्यंत सलग पट्यात आगीने जोर धरला. वेळीच तीन अग्निशामक दलाचे बंब दाखल झाले.दोन तासानंतर युद्धपातळीवर शेतकरी व गोळा झालेल्या नागरिकांनी अग्निशामक दलाच्या सहकार्याने आग आटोक्यात आणली.301 ते 315 गटनंबर क्षेत्रातील संपूर्ण ऊसशेती जळून खाक झाली. आगीत सुर्वे, कुरुंदवाडे,तनिंगे,खोत अशा भाऊबंदांच्या बारा शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले.
उसामध्ये सुकलेल्या पालापाचोळ्यामुळे आग चांगलीच भडकली. पावसाळ्यात पडलेला प्रचंड पाऊस, नंतरचा वादळी वाऱ्याचा तडाखा अशा अस्मानी व सुल्तानी संकटाने शेतकरी बेजार झाला आहे.त्यात अशा संकटाने शेतकऱ्यांना आणखी हादरे बसत आहेत.महावितरणचा गलथान कारभारामुळे हातासरशी आलेल्या उसाला बळी पडावे लागले. त्यामुळे नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी महावीतरणकडे केली.