तामिळनाडूत नवा कारखाना ः वार्षिक 4 लाख 20 हजार दुचाकींचे उत्पादन
वृत्तसंस्था / चेन्नई
इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रामध्ये कार्यरत असणार्या ऍथर एनर्जी कंपनीने तामिळनाडूतील होसूर येथे आपला दुसरा निर्मिती कारखाना सुरू केला आहे. 3 लाख चौरस फूट क्षेत्रफळामध्ये असणार्या या कारखान्यामध्ये आता यापुढे कंपनी दुचाकींची उत्पादन क्षमता ४ लाख २० हजार प्रति वर्ष प्रमाणे करणार असल्याचे समजते.
उत्पादन क्षमता वाढवण्याबाबतची माहिती कंपनीने नुकतीच दिली आहे. या ठिकाणी कंपनी ऍथर ४५० एक्स आणि ऍथर ४५० प्लस गाडय़ांचे उत्पादन हाती घेणार आहे. ऍथर एनर्जीचे सहसंस्थापक आणि सीटीओ स्वप्नील जैन यांनी माहिती देताना सांगितले की, नव्या कारखान्यामध्ये इलेक्ट्रिक दुचाकींचे उत्पादन नव्या तंत्रज्ञानासह केले जात असून उत्पादन क्षमता वाढवण्याबरोबरच उत्पादन दर्जाही दर्जेदार राहील याची काळजी घेतली जात आहे. ३ लाख चौरस फुटाच्या विस्तीर्ण परिसरात असलेल्या या कारखान्यामध्ये २ स्वतंत्र विभाग करण्यात आले असून एका स्वतंत्र विभागामध्ये बॅटरीचे उत्पादन घेतले जात असून दुसर्या विभागामध्ये वाहन उत्पादनाचे(असेम्बलिंग) कार्य हाती घेतले जात आहे. एकंदर वर्षाकाठी जवळपास ४ लाख २० हजार इतक्या इलेक्ट्रिक दुचाकी तयार करण्याची कंपनीने तयारी केली आहे. इंधन दरवाढीच्या काळात इलेक्ट्रिक दुचाकी ग्राहकांना दिलासा देत असून यातूनच वाढत्या मागणीची गरज पूर्ण करण्यासाठी निर्मिती क्षमतेमध्ये वाढ केली आहे.