वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रिलायन्स जिओच्या धरतीवर आता भारती एअरटेलही आपला डाटा केंद्रांमधील 25 टक्के हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे. भारती एअरटेलची सहकारी नेक्स्ट्रा डाटामधील अमेरिकेतील गुंतवणूक ग्रुप कार्लाइल समूहाला 1,780 कोटी रुपयांना 25 टक्के हिस्सा विकणार आहे.
यामध्ये नेक्स्ट्राचे मूल्यांकन 1.2 अब्ज डॉलर होण्याचे संकेत आहेत. जे 9,084 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. करार पूर्ण झाल्यावर कार्लाइलची उद्योगांमध्ये 25 टक्के हिस्सेदारी होणार असून बाकी 75 टक्के हिस्सेदारी एअरटेलची राहणार आहे. भारती एअरटेलने दिलेल्या माहितीनुसार भारती एअरटेल नेक्स्ट्रा डाटामध्ये 235 दशलक्ष डॉलर गुंतवणूक करणार आहे.
सदरच्या व्यवहाराला प्राधिकरणाची मंजुरी मिळायची आहे. याच्या आधारे कॉम्पीटीशन कमिशन ऑफ इंडियाकडूनही मंजुरी मिळण्याची वाट पाहिली जात आहे. नेक्स्ट्राचे मुख्यालय दिल्ली येथे आहे. ही भारत आणि ग्लोबल एंटरप्राईजेस, स्टार्टअप आदींना आपली सेवा देते. नेक्स्ट्राची देशभरात 10 मोठ-मोठी डाटा केंद्रे आहेत.