ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांना दुबईमध्ये 15 दिवसांसाठी म्हणजेच 2 ऑक्टोबरपर्यंत परवानगी नाकारण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी जयपूर मधून दुबईला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानातील प्रवाशाला कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. कंपनीने दोनवेळा नियमांचे उल्लंघन केले आहे.
तसेच एअर इंडिया एक्स्प्रेसला कोरोनाची लागण झालेल्या रुगांचा उपचार खर्च आणि क्वारंटाइनसाठी होणारा खर्च देखील द्यावा लागणार आहे. तसेच दुबईमध्ये पुन्हा सेवा सुरू होण्यासाठी अशा प्रकारच्या घटना पुन्हा होणार नाहीत याबाबत खात्री द्यावी लागणार आहे. त्यानंतरच पुन्हा परवानगी दिली जाणार आहे.
- नियम पुढीलप्रमाणे :
सरकारी विमान कंपनी एअर इंडियाने संयुक्त अरब अमिरातीला जाणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी गेल्या महिन्यापासून कोरोनाचे चाचणी अहवाल अनिवार्य केले आहेत.
मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व प्रवाशांना सरकारमान्य चाचणी केंद्रातून नकारात्मक अहवाल मिळवणे अनिवार्य आहे.
तसेच सर्वांची कोविड 19 पीसीआर चाचणी करणेही अनिवार्य आहे. परंतु विमान उड्डाण करण्याच्या 96 तासांपूर्वीचेही ते असू नये असे त्यात म्हटले आहे.