पिंपोडे बुद्रुक येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना
वार्ताहर/ एकंबे
पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव) येथे रविवार दि. 6 मार्च रोजी सकाळी 9.15 च्या सुमारास खाजगी शिकवणी वर्गासाठी गेलेल्या अकरावीतील विद्यार्थीनीचा त्याच गावातील 26 वर्षीय युवकाने एकतर्फी प्रेमातून चाकूने भोसकून खून केला. या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. निखिल राजेंद्र कुंभार असे हल्लेखोर युवकाचे नाव आहे. घटनेनंतर दुचाकीवरुन फरार झालेल्या निखिल कुंभार याने कोरेगावात फळांच्या ज्यूसच्या गाडय़ानजिक विष प्राशन केले. तेथून तो स्वतःहून कोरेगाव पोलीस ठाण्यात हजर झाला आणि विषारी औषध प्राशन केल्याचे त्याने सांगितले. त्याच्यावर कोरेगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुंभार याच्या विरोधात वाठारस्टेशन पोलीस ठाण्यात खुनाचा तर कोरेगाव पोलीस ठाण्यात आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, पिंपोडे बुद्रुक येथे निखिल कुंभार हा गेले काही दिवस सतत तिच्या मागे मागे करत होता. तो तिच्या प्रेमात वेडा झाला होता. ती कोणताही प्रतिसाद देत नसल्याने तो चिडला होता. अखेरीस एकतर्फी प्रेमातून त्याने रविवारी फैसला पाडण्याचाच निर्णय घेतला. सकाळी एस. टी. बसथांब्याच्या परिसरात असलेल्या एका खाजगी शिकवणी वर्गात ती गेली होती. त्यानंतर निखिल कुंभार याने तिला रस्त्यावर चाकूने भोसकले.
घटनेनंतर तो दुचाकीवरुन पळून गेला. प्रसंगावधान राखत तेथील किराणा दुकानदारांनी तिला तत्काळ गावातील रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने साताऱयातील खाजगी रुग्णालयात तिला उपचारार्थ हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिची प्राणज्योत मालवली.
निखिल कुंभार हा दुचाकीवरुन थेट कोरेगावात आला. साखळी पुलानजिक त्याने एका ज्युस सेंटरजवळ विषारी औषध पिले, त्यानंतर तो त्याच अवस्थेत पोलीस ठाण्यात गेला. तेथील कर्मचाऱयांना पिंपाडे बुद्रुक येथील घटनाक्रम त्याने सांगितला. त्याचबरोबर विषारी औषधाची पुडी देखील काढून दाखविली. पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांच्यासह कर्मचाऱयांनी तातडीने त्याला उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
अल्पवयीन विद्यार्थीनीच्या खूनाची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे व वाठार स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांच्यासह फौजफाटा तातडीने पिंपोडे बुद्रुक येथे दाखल झाला. गावातील वातावरण तणावपूर्ण होते. पोलीस अधिकाऱयांनी घटनास्थळाची पाहणी करुन पंचनामा केला. सातारच्या फॉरेन्सिक टीमने देखील घटनास्थळावर ठाण मांडले होते.
धनंजय लेंभे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात निखिल राजेंद्र कुंभार याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर कोरेगाव पोलीस ठाण्यात महिला पोलीस हवालदार इंदुताई घाडगे यांच्या फिर्यादीवरुन आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले व कोरेगावचे उपनिरीक्षक विशाल कदम तपास करत आहेत.