लोणावळा/प्रतिनिधी
मराठा आरक्षणा पाठोपाठ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्य्यावरून भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज भाजपकडून राज्यभरात चक्काजाम आंदोलन केलं जात आहे. तर महाविकास आघाडीकडून लोणावळ्यात ओबीसी मंथन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विजय वडेट्टीवार यांनी आपली भुमिका मांडली. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ हे देखील आक्रमक झाले होते. यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी विरोधकांना एकमेकांच्या चुका दाखवण्यापेक्षा एकत्र लढा उभारा असा सल्ला दिला.
विजय वडेट्टीवार म्हणाले, राजकीय पक्ष पक्षाची ताकद वाढावी म्हणून आंदोलन करतात. मात्र सामाजिक संघटना जे आंदोलन करतात ते समाजासाठी करतात. त्यामध्ये विश्वासहार्यता असते. आम्ही किती आंदोलने केली. पण वडेट्टीवार काँग्रेसची भुमिका मांडतात हाच त्याचा अर्थ निघेल. तसेच भाजपाने आंदोलने केली तर काँग्रेस विरोधात आहे राष्ट्रवादी विरोधात आहे, हा त्याचा अर्थ निघेल. म्हणून पक्षाच्या पलिकडे जाऊन हा विषय चर्चेला आणायला पाहिजे. एकामेकांकडे बोटे बाखवून मार्ग निघणार नाही. एकमेकांसोबत राहूया, सर्वांनी एकत्र येऊन लढा देऊ तेव्हा आरक्षणाचा प्रश्न किंवा ईतर प्रश्न असतील ते मार्गी लागतील, असा सल्ला वडेट्टीवार यांनी यावेळी विरोधकांना दिला.