वार्ताहर / कंग्राळी खुर्द
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी कांदा दरात 200 रुपयांची वाढ झाली तर सफेद कांद्याचे भाव मात्र स्थिर होते. बाजारात परराज्यातील बटाटा आवक मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. याचा परिणाम इंदूरचा बटाटा 100 रुपयांनी तर बेळगावचा लाल बटाटा 100 रुपयांनी आणि सफेद बटाटा 200 रुपयांनी कमी झाला. चांगल्या प्रकारच्या रताळी पिकाचा भाव 250 रुपयांनी वधारला आहे. गुळाचे भाव मात्र स्थिर होते.
बेळगाव बाजारात प्रतिबाजार 60 ट्रक कांद्याची गरज असते. यामध्ये बहुतांश कांदा लाल असतो. मात्र, बुधवारी 50 ट्रक कांदा आवक होती. यामध्ये 12 ट्रक कांदा सफेद होता. बाजारात मागणीपेक्षा लाल कांदा आवक कमी होती. याचा परिणाम कांदा दरात 200 रुपयांनी वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी विकी (महेश) सचदेव यांनी दिली.
बुधवारी बाजारात 50 ट्रक कांद्यामध्ये 35 ट्रक कांदा हा महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांचा होता तर 5 ट्रक कांदा कर्नाटकचा आणि 10 ट्रक कांदा गुजरातचा
होता.
बेळगाव बाजारात बटाटा आवक मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. आवकेच्या मानाने जावक थंडावली आहे. याचा परिणाम बटाटा दर 100 ते 200 रुपयांनी कमी झाला असल्याची माहिती व्यापारी राजू जाधव यांनी दिली. बुधवारी बाजारात परराज्यातील बटाटा आवक 21 ट्रक इतकी होती. यामध्ये इंदूरचा बटाटा 18 ट्रक, तळेगावचा बटाटा 2 ट्रक तर गुजरातचा बटाटा 1 ट्रक इतकी आवक होती. इंदूरचा बटाटा 100 रुपयांनी कमी झाला तर गुजरातचा आणि तळेगावचा बटाटा स्थिर असल्याची माहिती व्यापारी संजय पाटील यांनी दिली.
बेळगाव बाजारात रताळी आवक तुरळक प्रमाणात होत आहे. चांगल्या प्रतीची मलकापुरी रताळी 1600 रुपये तर सर्वसाधारण रताळी 800 ते 1250 रुपये असा भाव झाला असल्याची माहिती लेखापाल संजय खोराटे यांनी दिली.