कोरोना संसर्गाचा फटका, निर्बंधांची कडक अंमलबजावणी
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोनाचा प्रादुर्भाव अलिकडे वाढत चालला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शासन व प्रशासनाने कडक निर्बंध लादले आहेत. गर्दी होणार्या विवाह समारंभावरही मर्यादा आणून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे 80 टक्के लोकांनी एप्रिल व मे महिन्यातील मंगल कार्यालयांमधील विवाह समारंभाचे बुकींग रद्द केले आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या मंगल कार्यालयचालकांना याचा फटका बसला आहे. त्याबरोबर मंगल कार्यालयांशी संलग्न असणार्या केटरर्स,डेकोरेटर्स, बँडवाले आदी घटकांवरही त्याचा परिणाम झाला आहे.
कोरोनाच्या संसर्गामुळे सरकारने मार्गदर्शक तत्वे लागू केली आहेत. त्यामध्ये 50 लोकांच्या उपस्थितीत विवाह समारंभ करण्याची परवानगी दिली आहे. याचे उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालयचालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार त्याची अंमलबजावणीही सुरु करण्यात आली आहे. जिह्यात सुमारे 250 व कोल्हापूर शहरात 100च्या आसपास मंगल कार्यालये व हॉल आहेत. गेल्या दोन महिन्यांपूर्वी कोरोनाचा संसर्ग थोडा कमी होता. हे चित्र इथून पुढेही असेच राहून परिस्थिती आटोक्यात येईल, असा अंदाज घेऊन नागरिकांनी एप्रिल व मे महिन्यात मोठ्या प्रमाणात लग्न समारंभासाठी मंगल कार्यालये, हॉलचे बुकींग केले. परंतु या महिन्याभरात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे पुन्हा कडक निर्बंध लावून अंमलबजावणीही सुरु करण्यात आली.
परिणामी एप्रिल व मे महिन्यात केलेले लग्नाचे बुकींग रद्द व्हायला सुरुवात झाली. सुमारे 80 टक्के लोकांनी या दोन महिन्यातील मंगल कार्यालयातील बुकींग रद्द केले. लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरापासून आर्थिक अरिष्ठात असलेल्या मंगल कार्यालय चालकांना फटका बसला आहे. अनेक मोठÎा मंगल कार्यालयचालक व हॉलचलकांचे कर्जाचे हप्ते ही थकले आहेत. हा फटका त्यांच्या पुरता मर्यादीत नसून लग्न समारंभाशी निगडीत घटकांनाही तो बसला आहे. यामध्ये भटजी, बँडवाले, मंडपवाले, डेकोरेटर्स, फुलवाले, इव्हेंटवाले, तुतारीवाले, केटरर्स, भांडी धुणार्या महिला, वाढपी आदी घटक आर्थिक अडचणीत आहेत.
काही ठिकाणी बुकींगचे पैसे परत देण्यास टाळाटाळ
लग्नसमारंभासाठी आगाऊ रक्कम देऊन मंगल कार्यालये व हॉल बुकींग करण्यात आली आहेत. परंतु काही मंगल कार्यालयचालकांनी हे पैसे ग्राहकांना देण्यास टाळाटाळ केली आहे. यामुळे वादावादीचे प्रकारही होत आहेत. तर अनेक मंगल कार्यालयचालकांनी हे पैसे परत देऊन आपल्याबरोबरच ग्राहकांचीही अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
मंगलकार्यालयचालकांसह इतर घटक आर्थिक अडचणीत
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरापासून मंगल कार्यालयचालक व त्याच्याशी संलग्न घटक आर्थिक अडचणीत आहेत. आता तर मोठ्या प्रमाणात लग्न समारंभाचे बुकीग रद्द झाले आहे. याचा फटका मंगल कार्यालयचालकांना बसला आहे. प्रशासनानेही आयोजकांवर कारवाई न करता मंगलकार्यालयचालकांवर सुरु केलेली कारवाई ही एकतर्फी आहे. -सागर चव्हाण, जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर सामाजिक सेवा सांस्क़ृतिक मंगल कार्यालय संघ
वर्षभरापासून आर्थिक नुकसान
कोरोनामुळे गेल्या एक वर्षभरापासून मंगल कार्यालयचालकांना आर्थिक फटका बसला आहे. मालकच अडचणीत असल्याने कामगारांचा पगार कुठला देणार? त्यामुळे ते ही काम सोडून गेले आहेत. अनेक मंगल कार्यालयांमध्ये लग्नासाठी गेल्या सहा महिन्यात एकही बुकींग झालेले नाही. कार्यालय उघडून दररोज बुकींगची वाट बघावी लागत असल्याचे विदारक चित्र आहे. -उत्तम चौगुले, स्वामी समर्थ मंगल कार्यालय, संभाजीनगर, कोल्हापूर.