ऑनलाईन टीम / मुंबई :
एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी व कवी वरवरा राव यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते 81 वर्षांचे आहेत. मुंबईतील जे जे रुग्णालयातील डॉक्टर रंजीत मनकेश्वर यांनी वरवरा यांना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, 28 मे रोजी राव यांना जेजे रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा होत नसतानाही त्यांना तीनच दिवसांत पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले. पोलिसांच्या परवानगीने त्यांचे कुटुंबीयांशी दूरध्वनीवर बोलणे होत असताना त्यांचा आवाज क्षीण झाला होता. ते गोंधळलेले वाटत होते आणि त्यांना बोलणे जड जात होते,असे राव यांच्या पत्नीने सांगितले होते.
प्रकृती मागील काही दिवसांपासून खालावत चालली होती. याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना आवश्यक सुविधा देण्याची मागणी केलेली होती. दरम्यान, वरवरा राव यांची करोना चाचणी करण्यात आली होती. रिपोर्ट आल्यानंतर त्यांना करोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
गेल्या महिन्यात विशेष न्यायालयाने वरवरा राव यांच्या प्रकृतीची योग्य ती काळजी घ्यावी असे कारागृह प्रशासनाला सांगितले होते पण त्यांना जामीन नाकारला होता.