संसद अन् दिल्ली सोडणार : सोनिया गांधींना लिहिले पत्र :काँगेसमध्ये खळबळ
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेसचे वरिष्ठ नेते ए.के. अँटोनी राजकारणाला रामराम ठोकणार आहेत. त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून स्वतःच्या राजकीय संन्यासाची घोषणा केली आहे. राजकारण सोडल्यावर आपण दिल्लीत देखील राहणार नाही. लवकरच तिरुअनंतपुरममध्ये राहण्यास जाणार असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
काँग्रेस नेते अँटोनी यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ 2 एप्रिल रोजी पूर्ण होणार आहे. त्यानंतर आपण राजकारणात भाग घेणार नाही तसेच कुठलीच निवडणूक लढविणार नाही. राजकारण, दिल्ली आणि संसदेला कायमस्वरुपी रामराम ठोकणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
52 वर्षांपासून राजकारणात
अँटोनी मागील 52 वर्षांपासून भारतीय राजकारणात सक्रीय आहेत. विद्यार्थीदशेतील राजकारणापासून सुरुवात करत अँटोनी 1970 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले होते. त्यानंतर वयाच्या 37 व्या वर्षी अँटोनी केरळचे मुख्यमंत्री देखील झाले. आतापर्यंत तीनेवळा केरळचे मुख्यमंत्री, तीनवेळा केंद्रीय मंत्री, 5 वेळा राज्यसभा खासदार म्हणून त्यांनी काम केले आहे. काँग्रेसच्या संसदीय समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 10 वर्षे काम पाहिले आहे.
पूर्वीच विचार झाला होता पक्का
अँटोनी यांनी पूर्वीच राजकारणाला रामराम ठोकण्याचा विचार केला होता. याप्रकरणी विचार केल्यावर काही काळापूर्वी सोनिया गांधींना स्वतःच्या निर्णयासंबंधी सांगितले होते. राज्यसभा निवडणूक पुन्हा न लढविण्याची व्यक्त केली होती असे अँटोनी यांनी सांगितले आहे. याचबरोबर त्यांनी केरळमध्ये राज्य प्रभारी आणि अन्य सदस्यांना स्वतःच्या निर्णयासंबंधी कळविले होते.
दिग्गजांसोबत काम
अँटोनी हे काँग्रेस नेतृत्वाच्या विश्वासू नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी इंदिरा आणि राजीव गांधी यांच्या काळातही पक्षासाठी काम केले आहे. इंदिरा आणि राजीव गांधी यांच्या काळात ते अखिल भारतीय काँग्रेस समितीचे महासचिव होते. तर 2004 मध्ये मनमोहन सिंह यांच्या सरकारमध्ये ते संरक्षणमंत्री होते.