पुणे \ ऑनलाईन टीम
सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा काही नेम नाही. सध्या सगळीकडे धो…धो पाऊस पडत आहे. पाऊस म्हटल की छत्री आलीच. सोशल मीडियावर देखील सध्या छत्रीची चर्चा जोरदार रंगली आहे. ती पावसामुळे नाहीतर काँग्रेस विनामूल्य छत्री दुरुस्तीचा उपक्रमामुळे. पुण्यात पुणे काँग्रेसच्या वतीने काँग्रेस भवनात विनामूल्य छत्री दुरुस्तीचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. भाजपने या उपक्रमाची जोरदार खिल्ली उडवली आहे. मात्र झालं असं की या उपक्रमात चक्क भाजपची छत्री दुरुस्तीला आली आणि मग काय सोशल मीडियावर भाजपच्या या छत्रीची चर्चा रंगली. सोशल मीडियावर याचे काही फोटो देखील व्हायरल होत आहेत.
पुण्यात काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार मोहन जोशी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्री दुरुस्ती उपक्रमाला सोमवारी सामाजिक कार्यकर्त्या किरण मोघे यांच्या उपस्थितीत सुरूवात झाली.१९ जूनपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत नागरिकांना त्यांच्या छत्र्या मोफत दुरुस्त करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे छोट्या व्यावसायिकांवर आर्थिक संकट आले आहे.त्यांना हातभार लावण्यासाठी हा उपक्रम सुरू केला असल्याचा उद्देश जोशी यांनी व्यक्त केला आहे.
भाजपकडून या उपक्रमाची सोशल मीडियावर जोरदार खिल्ली उडवली जात आहे. भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत काँग्रेसला यावरून टोला लगावला आहे. सध्या दोन चिल्लर पक्षांच्या छताखाली असलेला काँग्रेस पक्ष फुटकळ कामांची किती मोठी जाहिरातबाजी करतोय पाहा. या होर्डिंगच्या किंमतीत ५० नव्या छत्र्या आल्या असत्या, असा टोला त्यांनी या ट्वीटच्या माध्यमातून लगावला आहे.
मात्र खऱी चर्चा तर तेव्हा रंगली जेव्हा काँग्रेसच्या या उपक्रमात काँग्रेस भवनात शुक्रवारी चक्क भाजपचं कमळ आणि खासदार गिरीश बापट व नगरसेविका गायत्री खडके यांची नावं असलेली एक छत्री दुरुस्तीला आली. .एकीकडे भाजपकडून काँग्रेसच्या या उपक्रमाची खिल्ली उडवली जात असताना भाजपची छत्री दुरुस्तीला आलेली पाहून उपस्थितांमध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. याचे फोटो देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.