आपल्या मनातील काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे सहा प्रबळ विकार आणि त्यांच्यापेक्षाही प्रबळ असा आपला अहंकार हेच ते सात उन्मत्त न आवरणारे बैल होत. भगवंताने कृपा केली तरच त्यांना वेसण घालून ताब्यात ठेवता येते. असे ज्यावेळी होईल त्यावेळीच सत्याची प्राप्ती होते. असा या कथेत पारमार्थिक भावार्थही दडला आहे.
त्यानंतरें प्रीतीकरून । कोसलपति कन्यादान। करिता जाला विस्मयें करून । कृष्णाकारणें सद्भावें। दोहींकडील मूळपत्रिका । सुहृदां आप्ता धाडिल्या देखा। वसनीं गौरवूनियां वार्तिकां । म्हणती ठाका समयातें ।अक्रूर गेला हस्तिनापुरा । पत्रिका अर्पिली युधि÷िरा । तेणें प्रेरिलें प्रार्थवीरा। माद्रीकुमरांसमवेत। उभयपक्षींचे सोयिरे आप्त । ऐकोनि पातले जी समस्त। वैदिक दैवज्ञ विपश्चित । आणिले त्वरित लग्नासी ।
कोसलपती नग्नाजिताने आपली कन्या सत्या हिचा विवाह कृष्णाबरोबर करावयाचे निश्चित केल्यावर वर पक्ष व वधू पक्षाने आपल्या सोयऱयांना आणि संबंधी राजांना विवाहाची आमंत्रणे पाठवली. अप्रुर यादवांच्या वतीने हस्तिनापुरास गेला व त्याने युधि÷िर व सर्व पांडवांना कृष्णाच्या या विवाहाचे आग्रहाचे निमंत्रण दिले. त्याप्रमाणे पांडवांसह सर्व राजे कोसलदेशात विवाहासाठी उपस्थित झाले.
ॐपुण्यकाळीं अंतःपट। सुटतां वधूवरें एकवट। द्विजवर करिती निगमपाठ। जाला बोभाट वाद्यांचा।मुक्ताफळीं लग्नाक्षता। कृष्णें घातल्या नोवरीमाथा । तेव्हां लाहूनि पूर्णता । जाली तत्त्वता हरियोग्य । कृष्णकृपेची योग्यता जाली । मग नोवरी हरिवरी अक्षता घाली । वियोगाची काळिमा गेली। सबाह्य भरली हरिलाभें । ऐसें पाणिग्रहण जालें । कंकण उभयांसि बांधलें । बोहर बोहला बैसविलें। मग आदरिलें हवनातें । अग्निप्रति÷ा आसादनीं । विवाहहोमीं शांतिपठनीं । अक्षता वधूवरांच्या मूर्ध्नि। टाकिल्या ब्राह्मणीं ते काळीं । सप्तपदी करपीडनीं। वरदक्षिणा चक्रपाणि। देता जाला आनंदोनी । कल्याणखाणी वधूजनक ।
नग्नाजिताने मोठय़ा थाटामाटात कृष्णाला आपली कन्या अर्पण केली. खूप मोठा खर्च त्याने केला. मोठा दानधर्म केला. त्या विवाहाचे सविस्तर वर्णन महामुनी शुकदेवांनी केले आहे. सत्याचे पाणिग्रहण झाले. वधूवरांवर अक्षता टाकून उपस्थितांनी त्यांना आशीर्वाद दिले. त्यानंतर सप्तपदी, होम इत्यादी विवाह विधी पार पडले.
कोशलपतीच्या समस्त वनिता।देखोनियां जामात दुहिता। हर्षनिर्भर जाल्या चित्ता। तेंचि श्रोतां परिसावें। राजपत्न्या प्रहृष्टचित्तीं। कृष्ण लाधली नाग्नजिती। परस्परें प्रियदंपती। भाग्य म्हणती कुमरीचें ।नेत्रीं आणोनियां अश्रुपात ।कन्या निरविती त्या समस्त। परमानंदें वोसंडत। म्हणती सुकृत हें फळलें। जन्मोनियां आमुचे जठरिं।दैवें वरिला त्वा श्रीहरि। कुळतारिणी नौका खरी। भवसागरिं तूं आम्हां । आमुचे कुळीं हे जन्मली। आम्हीं पुत्रवत् प्रतिपाळिली। आतां यदुनंदना अर्पिली। तुम्हीं पाळिली पाहिजे। जन्मोनियां आमुचे कुळीं। इणें वरिला श्रीवनमाळी। कृष्णअर्धांगीं शोभली । यास्तव जाली जगज्जननी। उचलूनियां दोहीं करिं। यादवांचें मांडियेवरी। बैसवूनियां विनति करी । जे स्नेहें नोवरी पाळावी ।
देवदत्त परुळेकर