आमदार टोनी फर्नांडीस यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन
प्रतिनिधी / पणजी
आजच्या घडीला लोकांचे प्राण वाचविणे महत्वाचे असताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी आरोप प्रत्यारोपांचे खेळ खेळणे बंद करावे असे आवाहन सांताक्रूजचे आमदार टोनी फर्नांडीस यांनी केले आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन आणि संबंधित उपकरणांचा पुरवठा तसेच ऑक्सिजन पाईपलाईनच्या देखभाल दुरुस्तीत झालेला घोळ व भ्रष्टाचारास जबाबदार असलेल्यांवर कोणताही मुलाहिजा न ठेवता मुख्यमंत्र्यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
आज गोमेकॉतील डॉक्टर, नर्सेस यांची चाललेली धावपळ पाहता कोणाचेही हृदय हेलावल्याशिवाय राहणार नाही. एका क्षणाची सुद्धा विश्रांती न घेता ते सेवा देत आहेत. आगशीचे पोलीस निरीक्षक विजय राणे यांनीही मानवतावादी असे महान कार्य केले आहे. गोमेकॉत जाऊन अन्य सहकाऱयांसह त्यांनी स्वतः गरजवंतांना ऑक्सिजन सिलिंडर पोहोचते केले. त्यांच्या या कार्याला मी सलाम करतो, असे फर्नांडीस म्हणाले.
गोमेकॉ आज कोरोना रुग्णांनी खचाखच भरलेली आहे. 40 रुग्णांची क्षमता असलेल्या वॉर्डमध्ये दुप्पट रुग्णांची भरती करण्यात आली आहे, असे चित्र असतान तेथील जी सुमारे 30 वर्षे जुनी गॅस पाईपलाईन आहे ती परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वेळीच दुरुस्त करून घेणे तसेच अन्य संबंधित उपकरणेही उपलब्ध करणे हे सरकारचे कर्तव्य होते. या हयगयीचा परिणाम केवळ कोरोना रुग्णांवरच नव्हे तर कित्येकांच्या ऑपरेशनवरसुद्धा झाला आहे.
आज मी जे बोलतो ते टीका करण्यासाठी नव्हे. परंतु तशीच वेळ आली आमि पाणी नाकापर्यंत पोहोचले तर मात्र गप्प बसणार नाही, असा इशाराही फर्नांडीस यांनी दिला. कितीतरी लोक ऑक्सिजनअभावी मृत्युमुखी पडत आहेत. स्वतः माझ्या हातातसुद्धा कित्येकांनी प्राण सोडले आहेत. ही परिस्थिती खरोखरच दयनीय आहे. गोमेकॉत रुग्णांना औषधे मिळत नाहीत, म्हणून आम्ही स्वतः थेट कंपनीकडून विकत घेऊन ती रुग्णांपर्यंत पोहोचविली आहेत. आज प्रत्येकाने एकमेकांकडे लक्ष देण्याची खरी गरज आहे. कोरोनापुढे संपूर्ण मानवजातच हतबल झालेली आहे, असे टोनी म्हणाले.
गोमेकॉला ऑक्सिजन पुरवठा करणाऱया स्कूप या कंपनीबद्दल असंख्य तक्रारी आपणापर्यंतही पोहोचल्या आहेत. या कंपनीकडून अनेक सिलिंडर्स एकतर रिकामी किंवा निम्मे भरलेले देण्यात येतात, अशी माहिती लोकांनी दिली असल्याचे टोनी यांनी सांगितले. असा प्रकार जर खरोखरच घडत असेल तर तो प्रचंड मोठा गुन्हाच आहे आणि सरकारने त्याची कसून चौकशी केलीच पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
बाबूश मोन्सेरात यांनी केलेले आरोप तंतोतंत खरे आहेत. गोमेकॉतील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच ते बोलतात, आपण त्यांच्या मताशी सहमत आहे, असे टोनी यांनी स्पष्ट केले.
गोमेकॉतील परिस्थिती आणि स्वतःची जबाबदारी हाताळण्यात आरोग्यमंत्री विश्वजित राणे हे पूर्णतः अपयशी ठरले आहेत, म्हणुनच मुख्यमंत्र्यांना त्यांचा कारभार स्वतःच्या हाती घ्यावा लागला. लोकांचे बळी जात असताना अन्य सर्व आमदार का गप्प आहेत, ते कुठे झोपले आहेत? तेच आपणास समजत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
गोमेकॉत सध्यस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या पाहता डॉक्टरांचीही प्रचंड कमतरता भासत आहे. व्हेंटिलेटर्स हाताळण्यासाठीच कित्येक डॉक्टर्स लागतात. अशावेळी रुग्णसंख्या वाढतच राहिली तर गोमेकॉतील 60 ते 70 टक्के भाग केवळ कोरोना रुग्णांसाठीच वापरावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला. त्यावर उपाय म्हणून बाजूचे सुपर स्पेशालिटी इस्पितळ पूर्णपणे कोरोनारुग्णांसाठीच वापरात आणावे लागेल. तरच रुग्णांना चांगले उपचार मिळू शकतील व गोमंतकीयांना आपण वाचू शकेल याची खात्री पटेल, असे टोनी म्हणाले.
यापूर्वी विधानसभेत बोलताना आपण राज्याच्या अर्थसंकल्पातील 40 टक्के निधी हा केवळ आरोग्य सुविधांसाठी असावा, अशी मागणी केली होती, त्याचा आज पुनरुच्चार करतो, असेही ते म्हणाले.
दरम्यान, आमदार बाबूश मोन्सेरात यांनी गोमेकॉतील घोळ व गैरव्यवस्थापनासाठी केलेल्या सीबीआय चौकशीच्या मागणीला आपणही पाठिंबा देतो, असे एका प्रश्नावर बोलताना आमदार फर्नांडीस यांनी म्हटले आहे.