ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून 2028 मध्ये लॉस एंजेलिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऑलिम्पिक 2028, 2032 आणि त्यानंतर होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी एक कार्यकारी गट स्थापन करण्यात आला आहे. अमेरिकेत जवळपास 30 दशलक्ष क्रिकेट चाहते राहत असल्याने आम्ही तेथे 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याचा प्रयत्न करू.
दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करावा अशी मागणी दीर्घकाळापासून होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या विषयावर आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. ऑलिम्पिकमध्ये समावेश झाल्यास भारत क्रिकेटमध्ये सहभागी होईल, असे बीसीसीआयने म्हटले आहे. आता टोकियो ऑलिम्पिक 2020 संपल्यानंतर पॅरिसमध्ये 2024 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकची तयारी सुरू करण्यात आली आहे.