पाकिस्तान दौऱयासाठी संघाची घोषणा, ऑस्ट्रेलियाचा 24 वर्षांनंतर पहिलाच पाकिस्तान दौरा
वृत्तसंस्था/ ब्रिस्बेन
तब्बल 24 वर्षांनंतर प्रथमच पाकिस्तान दौऱयावर जाणाऱया ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघामध्ये उस्मान ख्वॉजा आणि ऍस्टॉन ऍगर यांचा समावेश करण्यात आला आहे. मंगळवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पाक दौऱयासाठी 18 जणांचा संघ घोषित केला. या दौऱयामध्ये उभय संघात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळविली जात आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ प्रमुख प्रशिक्षक लँगरच्या गैरहजेरीत चार वर्षांनंतर प्रथमच विदेश दौऱयावर जात आहे. या दौऱयासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अँड्रय़ू मॅक डोनॉल्डची हंगामी मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे.
जस्टीन लँगरने आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा यापूर्वीच दिला. दरम्यान क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि लँगर यांच्यात नव्या कराराच्या कालावधी संदर्भात मतभेद झाल्याने लँगरने आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा सादर केला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने लँगरला 6 महिन्यांची मुदतवाढ देऊ केली तर लँगरने दीर्घ कालावधीचा करार करण्याची अट क्रिकेट ऑस्ट्रेलियाला घातली होती. करारा संदर्भातील चर्चेच्यावेळी कर्णधार पॅट कमिन्सने आपला पाठिंबा लँगरला न दिल्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींग व अन्य काही माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी कमिन्सवर टीका केली. ऑस्ट्रेलियाचा संघ फेब्रुवारीच्या अखेरीस पाकच्या दौऱयावर प्रयाण करेल. तीन सामन्यांच्या या कसोटीतील पहिला सामना 4 मार्चपासून रावळपिंडीत खेळविला जाणार आहे.
अलीकडेच ऑस्ट्रेलियन संघाने ऍशेस मालिकेत इंग्लंडचा 4-0 असा दणदणीत पराभव केला. ऑस्ट्रेलियन कसोटी संघामध्ये या दौऱयासाठी उस्मान ख्वॉजाची निवड करण्यात आल्याने मार्कस हॅरिसला आता तळाच्या क्रमांकावर फलंदाजीस पाठविले जाईल, असा अंदाज आहे. त्याचप्रमाणे ऍस्टॉन ऍगरचा समावेश करण्यात आला आहे.
1998 नंतर प्रथमच ऑस्ट्रेलियाचा संघ पाकच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयामध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका, तीन सामन्यांची वनडे मालिका आणि एकमेव टी-20 सामना खेळविला जाणार आहे. ऑस्ट्रेलियन निवड समिती या दौऱयातील वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा स्वतंत्रपणे नंतर करणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाला या दौऱयात प्रशिक्षक लँगरची उणीव निश्चितच भासेल. 1994 साली लँगरने लाहोरमधील झालेल्या कसोटीत शतक झळकविले होते तर 1998 च्या दौऱयामध्ये कसोटी मालिकेत एक शतक आणि दोन अर्धशतके नोंदविली होती.
ऑस्ट्रेलिया कसोटी संघ- पॅट कमिन्स (कर्णधार), ऍस्टॉन ऍगर, स्कॉट बोलँड, ऍलेक्स कॅरे, कॅमेरून ग्रीन, मार्कस हॅरिस, हॅजलवूड, ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वॉजा, लाबूसिंघे, नॅथन लियॉन, मिशेल मार्श, मिशेल नेसर, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, मिशेल स्वेप्सन आणि डेव्हिड वॉर्नर.