वृत्तसंस्था/ मेलबोर्न
यजमान ऑस्ट्रेलिया आणि अफगाण यांच्यात एकमेव कसोटी सामना तसेच त्यानंतर न्यूझीलंड विरुद्धची वनडे मालिका आयोजित केली होती. पण कोरोनाच्या संकटामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अफगाणबरोबरची एकमेव कसोटी आणि त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध होणारी वनडे मालिका लांबणीवर टाकण्याची घोषणा शुक्रवारी केली आहे.
या वर्षी नोव्हेंबरमध्ये अफगाण आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकमेव कसोटी सामना आयोजित केला होता. तर न्यूझीलंडचा संघ 2021 च्या जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियात दाखल होणार होता. पण आता हे दोन्ही दौरे 2021-22 च्या उन्हाळी मोसमापर्यंत लांबणीवर टाकण्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला आहे. चालू वर्षाअखेरीस भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱयावर जाणार आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियात ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणारी आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धाही कोरोना समस्येमुळे लांबणीवर टाकावी लागली. कोरोनाच्या भीतीमुळे ऑस्टेलियातील होणाऱया क्रिकेट स्पर्धावर साशंकतेचे सावट यापूर्वीच निर्माण झाले होते. सध्या संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि अफगाणचे अनेक क्रिकेटपटू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा 10 नोव्हेंबरला संपणार असून त्यानंतर या स्पर्धेत सहभागी झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि अफगाणच्या क्रिकेटपटूंना ऑस्ट्रेलियात येण्यापूर्वी दोन आठवडय़ांसाठी क्वारंटाईन व्हावे लागेल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने सांगितले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार सामन्यांची कसोटी मालिका होणार असून या मालिकेतील पहिला सामना 3 डिसेंबरला ब्रिस्बेनमध्ये खेळविला जाईल. कसोटी मालिका संपल्यानंतर उभय संघात तीन सामन्यांची वनडे मालिका होणार आहे.