ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ओडिशा सरकारने 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
ओडिशा सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे की, हे लॉकडाऊन 1 जूनच्या सकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. या काळात राज्यातील नागरिकांना केवळ 4 तासांसाठी आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी सूट देण्यात आली आहे. सकाळी 7 ते 11 या काळात नागरिकांसाठी अत्यावश्यक वस्तूंची दुकाने सुरू असणार आहेत. ओडिशा सरकारने यापूर्वी देखील 5 ते 19 मे दरम्यान 14 दिवसांचा लॉकडाऊन जारी केला होता. आता सरकारने 1 जून पर्यंत लॉकडाऊन वाढवले असून विकेंड काळात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.
दरम्यान, राज्यातील रेशन दुकाने, फळे, भाजीपाला, दूध आदी दुकाने सुरू असणार आहेत. तसेच रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये पार्सल सेवा सुरू असणार आहे. मात्र, या काळात कोरोनाबाबतच्या नियमावलीची पालन करणे सक्तीचे करण्यात आले आहे.
- मागील 24 तासात 10,321 नवीन कोरोना रुग्ण
ओडिशा राज्यात मंगळवारी 10,321 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 6 लाख 33 हजार 302 वर पोहोचली आहे. तर सद्य स्थितीत 1,04,539 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.