नाटय़संहिता लेखनात एखाद्या काळाचा पट उलगडायचा किंवा त्यातील घटनांबाबत पात्राच्या मनातील भावना व्यक्त करायच्या असतील तर स्वगत उपयुक्त ठरते. तसे स्वगत अमेरिकेचे भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी लिहिले आहे. ’अ प्रॉमिस्ड लँड’ नावाच्या राजकीय आठवणींच्या पुस्तकाच्या पहिल्या भागात त्यांनी 2008 आणि 2010 साली दिलेल्या भारतभेटीत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, युपीए अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी झालेल्या भेटी, त्यात झालेल्या चर्चेला अनुषंगून आठवणी लिहिल्या आहेत. त्यांच्या या पुस्तकाचा पहिला भाग 2011 साली ओसामा बिन लादेन याचा खात्मा केल्याच्या प्रकरणाने संपतो. त्यापुढचा भाग म्हणजे ओबामांच्या व्हाईट हाऊसमधील अंतिम काळ, अमेरिकेची डळमळीत अर्थव्यवस्था, जगभर अडकून पडलेले अमेरिकी सैनिक, देशांतर्गत बेरोजगारी, ट्रम्प यांचा विखारी प्रचार, हिलरी क्लिंटन यांचा पराभव आणि भारताच्यादृष्टीने विचार केल्यास मोदी सत्तेवर येणे, त्यांना ’अमेरिकन व्हिसा नाकारणे ही आता जुनी गोष्ट झाली’ असे ओबामा सरकारने जाहीर करणे, चीन-पाकिस्तान प्रश्नावर मोदींना पाचदा वेळ देणे, 2015 साली भारताला भेट, 2017 मध्ये ओबामा फाऊंडेशनद्वारे प्रागतिक विचारांची युवा आणि उद्योजकांची फळी जगभराबरोबर भारतात उभारण्यासाठी प्रयत्न करणे ते ट्रम्प यांना घालवून बायडन अमेरिकेत सत्तेवर येणे यापर्यंतचा भाग जेव्हा प्रसिद्ध होईल तेव्हा ओबामांचे नेमके म्हणणे स्पष्टपणे समजून येईल. मात्र तरीही पुस्तकाच्या पहिल्या खंडात भारतासाठी खर्चलेले त्यांचे चौदाशे शब्दसुद्धा बरेच काही सांगून जाणारे आहेत. यात फक्त राहुल गांधी यांच्यावर ओबामा यांनी जिद्द आणि योग्यतेची कमतरता असणारा प्रामाणिक, नर्व्हस विद्यार्थी अशी टीका केली आहे इतकेच सांगणे हा झाला प्रपोगंडा. प्रत्यक्षात त्यांना या टीकेमागचा विचार कुठपर्यंत न्यायचा आहे याचा विचार करायला मूळ पुस्तक वाचले पाहिजे. अर्थात ते तात्काळ हाती येणार नसले तरी ओबामा यांना काय म्हणायचे आहे त्याची एक दिशा बीबीसीसारख्या वृत्तसंस्थेने आपल्यापर्यंत पोचवलेली आहे. 2010 मध्ये मनमोहनसिंग यांनी चर्चा करताना पुढील चार वर्षात मुस्लिम विरोधी वातावरणाने भारतात हिंदू राष्ट्रवादी पक्षाचा प्रभाव वाढेल. अनिश्चिततेच्या काळात लोकांना धार्मिक आणि वांशिक ध्रुवीकरणाच्या हाका खूप भारावून टाकणाऱया वाटतात. भारतात काय किंवा जगात काय राजकारणात याचा फायदा घेणे अजिबात अवघड नाही. असेच सांगितल्याचे ओबामा यांनी नमूद केले आहे. नव्या चेक रिपब्लिकच्या पहिल्या अध्यक्षांनाही युरोपात वाढत्या परंपरावादी लाटेची चिंता वाटते. ग्लोबलायझेशन आणि आर्थिक संकटांमुळे श्रीमंत देश परंपरावादी लाटांना बळी पडत असतील तर भारत त्यापासून अलिप्त कसा राहील असे ओबामा म्हणतात. मनमोहनसिंग यांनी उदारमतवादी लोकशाही मूल्ये जपली, राज्यघटना जपली, जीडीपी वाढवला, सामाजिक सुरक्षेची व्याप्ती वाढवली लोकशाहीत हेच सगळे करायचे असते अशी त्यांची आणि आपली भावना होती. पण बदलती सरकारे, विभाजनवादी अनेक चळवळी, भ्रष्टाचार यातूनही भारत यशस्वी आहे. तिथली लोकशाही सशक्त पण अर्थव्यवस्था अनिर्बंध, गांधीजींच्या स्वप्नातला समतावादी शांतताप्रिय आणि शाश्वत समाजाच्या जवळपासही न पोहोचणारा भारत. तिथल्या जगण्याचा हिस्सा बनलेल्या हिंसेला घेऊन मनमोहनसिंग पायउतार झाल्यानंतर त्याचे काय होईल? सत्ता राहुल यांच्या हाती जाईल की भाजपचा विभाजनवादी राष्ट्रवाद जिंकेल असा प्रश्न ओबामा विचारतात. डायरीतील या पानांवरुन भारताच्याच नव्हे तर अमेरिकेबाबत काय चिंता सतावत होती याचेही दर्शन घडते! त्यांचा देश क्लिंटन किंवा ट्रम्प कोणाच्याही ताब्यात जाण्याने जी चिंता त्यांच्या मनात व्यापून राहिली होती तीच चिंता ते भारताविषयीही व्यक्त करताना दिसतात. एकप्रकारे ते त्यांचे स्वगतच असते. त्यामुळेच 2008 साली मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर हल्ला करण्याचा प्रचार सुरू असताना जागतिक शांततेसाठी गप्प राहणे मनमोहनसिंग यांना भोवले असे म्हणताना 2011 साली तेल संपन्न मुस्लिम राष्ट्रे आर्थिक दिवाळखोरीत निघाल्याची संधी साधून ओबामा लादेनला एखाद्या किडा-मुंगीसारखे सहज चिरडून दाखवतात. पण तरीही त्यांचा पक्ष अध्यक्षपद राखू शकत नाही कारण इतर आव्हाने जनतेला त्याहून मोठी वाटतात. अगदी पंतप्रधान मोदींच्या साथीने अमेरिकेत काही लाख नोकऱया वाढतील असा आभास निर्माण करूनही त्यांच्या पक्षाच्या ते पथ्यावर पडत नाही. त्या अपयशावरील भाष्य कदाचित दुसऱया खंडात वाचायला मिळेल. अमेरिकेत परंपरावादी सत्ता उलथवून त्यांचे सहकारी जो बायडेन सत्तेवर येताच ओबामा यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. बायडेन यांचा मनमोहन सिंग यांच्या बाजूने झुकाव आहे असाही एक प्रपोगंडा भारतात सुरू आहे. त्यादृष्टीने ओबामा यांचे हे स्वगत विचारात घेतले तर ते मोदी आणि भाजपवर दबाव निर्माण करीत आहेत की राहुल गांधी यांना आपल्या नेतृत्वातील उणिवा सुधारण्यास सूचित करत आहेत हे काळच सांगेल. आर्थिक हितासाठी जगातील कोणाही राज्यकर्ते किंवा हुकूमशहाशी जुळवून घेताना अमेरिकेने मागे पुढे पाहिले नाही. आपल्या देशाचा फायदा कशात एवढेच ते बघतात. भारतीय राजकारण्यांनीही ओबामांच्या स्वगताबद्दल वादविवाद करत बसण्यापेक्षा आपल्या देशाचा फायदा कशात आहे इतकाच विचार केलेला बरा. बाकी ज्याचे त्याचे हिशेब जनता निरंतरपणे ज्या-त्या राज्यातल्या निवडणुकीत चुकते करतच असते!
Previous Articleये मन है!
Next Article कर्नाटक : कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत सतत चढ-उतार
Related Posts
Add A Comment