बेंगळूरमध्ये जारी : उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांच्याकडून चालना : लवकरच राज्यभरात सुरु होणार
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात ऑक्सिजन वेळेत उपलब्ध होत नसल्याने कोरोनाबाधित रुग्णांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यावर तोडगा म्हणून बेंगळूर शहरात ऑला कॅबद्वारे कोरोना रुग्णांना घरपोच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी बुधवारी या व्यवस्थेचा शुभारंभ केला.
बेंगळूरमध्ये रुग्णांना घरपोच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाठविण्याची योजना यशस्वी झाली तर संपूर्ण राज्यात अशी व्यवस्था आमलात आणण्यात येणार आहे. याकामी राज्य सरकारला गिव्ह इंडिया आणि ओला कॅब कंपनीने हातभार लावला आहे. याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण म्हणाले, संपूर्ण राज्यात प्रथम मल्लेश्वरम विधानसभा मतदारसंघामध्ये घरपोच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाठविण्याची व्यवस्था आपण राबविली होती. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाल्याने संपूर्ण बेंगळुरात ही व्यवस्था करण्यासाठी ओला कॅब कंपनीकडून सहकार्य मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.
होम आयसोलेशन असणाऱया कोरोना रुग्णांची ऑक्सिजन पातळी 94 पेक्षा कमी असेल तर त्यांना ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात येईल. संबंधितांनी ओला कंपनीमार्फत ऑनलाईन मागणी केल्यास केवळ 30 मिनिटांत घरपोच ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाठविण्यात येणार आहे. ही सुविधा मोफत असली तरी बाधितांना यासाठी 5 हजार रुपये डिपॉझिट जमा करावे लागेल. कॉन्सन्ट्रेटर परत करताना ही रक्कम परत करण्यात येणार आहे. शिवाय हे उपकरण कसे हाताळावे, याबाबत माहितीही देण्यात येईल, असे डॉ. अश्वथ नारायण यांनी सांगितले.
टेलिकन्सल्टंसी देण्याचाही विचार
सध्या 500 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करण्यात आले आहेत. बुधवारी कोरमंगल आणि मल्लेश्वरम परिसरात या योजनेला प्रारंभ झाला. टप्प्याटप्प्याने या व्यवस्थेचा विस्तार करण्यात येत आहे. ही व्यवस्था मोफत असणार आहे. शिवाय टेलिकन्सल्टंसी देण्याचा विचारही सरकारचा आहे, असे ते म्हणाले.