मजुरांचा तुटवडा : रोगाचे प्रमाण कमी असल्याने भातपिके जोमात : निसर्गाची पिकांना चांगली साथ
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक, कंग्राळी खुर्द, अलतगा, गौंडवाड किर्यात परिसरामध्ये भातकापणी व मळणी कामांना जोरदार प्रारंभ झाला आहे. मात्र सर्व शेतकरीवर्ग एकाचवेळी भातकापणीच्या धांदलीमध्ये असल्यामुळे मजुरांचा तुटवडा भासू लागला आहे. एकंदर यावर्षी कंग्राळी किर्यात परिसरामध्ये भातपिकावर रोगाचे प्रमाण अगदी कमी असल्यामुळे उर्वरित भातपिके जोमात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यावर्षी प्रारंभापासूनच म्हणजे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांनाही पावसाने चांगला हंगाम दिला होता. भातपेरणीच्या कामांनासुद्धा निसर्गाने चांगली साथ दिली. यामुळे यावर्षी भातपिके जोमात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
40 टक्के रोपलागवडीवर भर
सध्या कंग्राळी किर्यात परिसरामध्ये 20 टक्के भातपेरणी तर जवळजवळ 40 टक्के रोपलागवडीवर भर देण्यात येत आहे. रोपलागवडीवेळी चार दिवस भरपूर काम लागते. गणेश चतुर्थीच्या तोंडावर एकदा साधी भांगलण झाली की एकदम भातकापणी करायची. तर भातपेरणीमध्ये पेरणीपासून कापणीपर्यंत कामच काम लागते. दरम्यान, शेतकऱयाला कधी आराम मिळतच नाही. भातरोप लागवडमध्ये निसर्गाने व्यवस्थित साथ दिल्यास पावसाच्या तसेच पंपसेटच्या पाण्यावरदेखील रोपलागवड केलेल्या शेतकऱयांना भरघोस उत्पादन मिळते. तसेच भातरोपामध्ये हवा खेळती राहत असल्यामुळे रोगराईसुद्धा हेत नाही. यामुळे सध्या पंपसेटच्या पाण्यावर भातरोप लागवडसुद्धा होत असल्याच्या प्रतिक्रिया जाणकार शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहेत.
पावसाळी बटाटे लागवड कालबाह्य
कंग्राळी किर्यात परिसरामध्ये व बेळगावची उपनगरे वाढत असल्यामुळे पिकाऊ जमिनी संपत आल्या आहेत. पिकाऊ जमिनीमध्ये काँक्रीटची जंगले उभी रहात आहेत. पावसाळी बटाटे लागवड करणाऱया जमिनी शेतकऱयांच्या प्रापंचिक गरजेसाठी विकल्यामुळे सर्वत्र बंगलेच बंगले पहायला मिळत आहेत. परिणामी पिकाऊ जमीनच शिल्लक नसल्यामुळे कंग्राळी किर्यात परिसरामध्ये पावसाळी बटाटे लागवड कालबाह्य झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
ऊस लागवडीकडे शेतकरी वर्गाचा कल
सध्या भातपिकाला बाजारपेठेमध्ये म्हणावा तसा दर मिळत नसल्यामुळे तसेच रोगराईच्या प्रादुर्भावामुळे शेतकरीवर्ग ऊस लागवडीकडे पुन्हा वळल्याचे चित्र दिसून येत आहे. पूर्वी साखर कारखानदार वेळेत उसाची उचल करत नव्हते, परंतु आता महाराष्ट्र व कर्नाटकमधील साखर कारखाने उसाची उचल वेळेत करत असून ऊसपिकाला दरही चांगला मिळत आहे. यामुळे शेतकरीवर्ग ऊसपिकाकडे वळल्याचे दिसून येत आहे.
भाताला-उसाला चांगला दर देण्याची मागणी
शासनाने भातपिकाला 2500 रुपयांहून अधिक तर ऊसपिकाला 3000 रुपयांहून अधिक दर मंजूर करावा. तुटपुंज्या दरामुळे शेतकरीवर्ग आर्थिक संकटामध्येच भरडला जात आहे. वरीलप्रमाणे शासनाने दोन्ही पिकांना दर दिल्यास शेतकरी वर्गाचीसुद्धा थोडी आर्थिक सुधारणा होईल. कर्जमुक्त होण्यास साथ मिळेल. आत्महत्येसारखी प्रकरणे थांबतील. यासाठी शासनाने दोन्ही पिकांना चांगला दर मंजूर करून द्यावा. खरेदीदारांनासुद्धा या दराने खरेदी करण्यास कळवून शेतकरी वर्गाला दिलासा देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.