उपाध्यक्षपदी अनिल पावशे : समसमान मते पडल्याने चिठ्ठीद्वारे निवड
वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक ग्राम पंचायतीच्या बुधवारी झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत अध्यक्षपदी संध्या उमेश चौगुले विजयी झाल्या तर उपाध्यक्षपदी अनिल यल्लाप्पा पावशे विजयी झाले. 34 सदस्य असलेल्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी झालेल्या गुप्त मतदानामध्ये समसमान मते पडल्यामुळे निवडणूक अधिकाऱयांनी चिठ्ठीद्वारे अध्यक्षपदी संध्या चौगुले यांची निवड घोषित केली.
निवडणूक अधिकारी म्हणून पंचायत प्रशासक अधिकारी जगन्नाथ जंगमशेट्टी, पीडीओ जी. आय. बर्गी, सेपेटरी सुनंदा एन. उपस्थित होते.
बुधवारी दुपारी 12.30 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. अध्यक्षपदासाठी पूनम जयराम पाटील व संध्या उमेश चौगुले यांनी अर्ज भरले होते. उपाध्यक्षपदासाठी अनिल यल्लाप्पा पावशे व सुजाता सुरेश जठार (गौंडवाड) यांनी अर्ज दाखल केले होते. मतदान प्रक्रियेमध्ये अध्यक्षपदासाठी दोघांना 17-17 समान मते पडल्यामुळे चिठ्ठीद्वारे अध्यक्ष निवड केली. यामध्ये संध्या चौगुले यांची अध्यक्षपदी निवड घोषित केली. तर उपाध्यक्षपदासाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत अनिल पावशे यांना 22 मते पडली तर सुजाता जठार यांना 12 मतांवर समाधान मानावे लागले. अनिल पावशे यांची उपाध्यक्षपदी निवड घोषित करण्यात आली.
निवडीनंतर अध्यक्षा संध्या चौगुले यांचा ग्रा. पं. सेपेटरी सुनंदा एन. यांच्या हस्ते तर उपाध्यक्ष अनिल पावशे यांचा पीडीओ जी. आय. बर्गी यांच्या हस्ते हार घालून सत्कार केला.
नूतन अध्यक्ष-उपाध्यक्षांनी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊनच कंग्राळी बुद्रुक व गौंडवाड गावांचा विकास करण्याचे मनोगत व्यक्त केले.
गावचा सर्वांगीण विकास करणार
नूतन अध्यक्षा संध्या चौगुले व उपाध्यक्ष अनिल पावशे ‘तरुण भारत’शी बोलताना म्हणाले, हा विजय संपूर्ण गावचा व लोकांनी आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाचा आहे. आम्ही सर्व सदस्यांना विश्वासात घेऊनच गावचा सर्वांगीण विकास करू. त्याचबरोबर एक आदर्श ग्राम पंचायत बनवू, असे मनोगत व्यक्त केले. नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांनी गावच्या मध्य चौकातील शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ मूर्तीचे पूजन केले. गावातील सर्व देवदेवतांचेही पूजन करून आशीर्वाद घेतला.
निवडणूक प्रक्रियेवेळी काकती पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला होता. यावेळी सर्व नूतन ग्रा. पं. सदस्य, सदस्या, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.