वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक
येथील जागृत देवस्थान श्री कलमेश्वर मंदिरामध्ये यंदा नवरात्रोत्सव व दसरोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला. कंग्राळी बुद्रुक गावासह पंचक्रोशीतील व महाराष्ट्रातील अनेक भक्त नवस फेडण्यासाठी नऊ दिवस उपवास करून मंदिरामध्ये वास्तव्य करतात. मात्र, यंदा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता.
श्री कलमेश्वर श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या भेटी
गावच्या पूर्व दिशेला असणाऱया श्री सिद्धेश्वर देवस्थानकडे श्री कलमेश्वर देवस्थानची पालखी देवस्थान पंच कमिटी सदस्य, पुजारी व मोजक्यांच भक्तांच्या उपस्थित श्री सिद्धेश्वर देवस्थानकडे आणून त्या ठिकाणी दोन्ही भावांची भेट घडवून विधिवत पूजा, गाऱहाणे आदी कार्यक्रम झाल्यावर कलमेश्वर देवस्थानची पालखी परत गावाकडे आणण्यात आली. येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरापासून बाहेर गल्ली, लक्ष्मी गल्ली, नेताजी गल्ली, कलमेश्वर गल्लीतून हनुमान भजनी मंडळच्या टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सुहासिनींनी आरती ओवाळून पालखीचे पूजन केले. शेवटी श्री कलमेश्वर मंदिराकडे पालखी आल्यानंतर दसरोत्सवाची सांगता करण्यात आली.
गौंडवाडमध्येही दसरोत्सव साधेपणाने
गौंडवाड गावचे जागृत देवस्थान श्री भैरवनाथ मंदिरामध्ये यावर्षी दसरोत्सव साधेपणाने करण्यात आला. नऊ दिवस देवस्थान पंच कमिटी सदस्य व पुजारी व मोजकेच भाविक अशा समूहामध्ये नऊ दिवस पूजा करण्यात आली.
विजयादशमी दिवशी गावच्या उत्तर दिशेला असलेल्या सीमेवर पालखी नेण्यात आली. सीमेवर विधिवत पूजा, गाऱहाणे आदी कार्यक्रम करून पालखी गावामध्ये आणण्यात आली.
संपूर्ण गावभर साध्या वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. सुहासिनींनी आरती ओवाळून भैरवनाथ देवस्थानच्या पालखीचे पूजन केले. शेवटी भैरवनाथ मंदिरकडे पालखी आल्यानंतर दसरोत्सवाची सांगता करण्यात आली.