प्रतिनिधी/ पणजी
बारा महिने कंत्राट व पगारवाढ नको, आम्हाला नोकरीत कायम करा या मागणीवर आंदोलनकर्त्या पॅरा शिक्षक ठाम असून मागण्या पूर्ण होईपर्यंत विविध माध्यमातून आंदोलन सुरुच राहणार आहे, असा इशारा पॅरा शिक्षक संघटनेने दिलेला आहे. आगशी पोलीस स्थानकात तब्बल दोन दिवस व दोन रात्री या शिक्षकांनी ठिय्या मांडला. विधानसभा अधिवेशनातही विरोधकांनी त्यांचा मुद्दा जोरदारपणे मांडला.
दोन दिवस आगशी पोलीस स्थानकावर ठिय्या
पंधरा वर्षे कंत्राटी सेवेत असलेल्या 129 शिक्षकांना सेवेत कायम करण्याची त्यांची मागणी आहे. या मागणीसाठी गेल्या सोमवारपासून पॅरा शिक्षकांची पणजीच्या आझाद मैदानावर निदर्शने सुरु आहेत. गुरुवारी सकाळी विधानसभेवर मोर्चा नेण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी त्यांना अटक करून आगशी पोलीस स्थानकात स्थानबद्ध केले. सायंकाळी पोलिसांनी त्यांची सुटका केल्याचे सांगितले. मात्र सरकारच्या या कृतीचा निषेध म्हणून गुरुवारचा व शुक्रवार असे दोन दिवस व दोन रात्री या शिक्षकांनी ठिय्या मांडला. उशिरापर्यंत सुरु असलेल्या अधिवेशनात रात्री 1.30 वा. विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत व इतर आमदारांनी या मुद्यावरुन मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढविला. त्यामुळे शिक्षक खात्यातील एका अधिकाऱयाला रात्री दीड वाजता आगशी पोलीस स्थानकात चर्चेसाठी पाठविण्यात आले. तूर्त आंदोलन मागे घ्या, मागण्यांवर सकाळी चर्चा करु हा सरकारचा प्रस्ताव शिक्षिकांनी धुडकावून लावला. अधिवेशन आटोपून पहाटे 5 वा. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी आगशी पोलीस स्थानकात येऊन शिक्षिकांची भेट घेतली व हा विषय आपण प्रामुख्याने विधानसभेत मांडल्याचे त्यांनी सांगितले.
बारा महिने कंत्राटाची ऑफर नाकारली
शुक्रवारी सकाळी शिक्षण खात्यातील दोघा अधिकाऱयांनी पुन्हा आगशी पोलीस स्थानकात येऊन सरकारने दिलेला बारा महिने कंत्राट व पगारवाढीचा प्रस्ताव मांडला. शिक्षकांनी तो मान्य नसल्याचे सांगून सरकारने आमच्या भवितव्याबाबत मागण्यांवर लेखी हमी देण्याची मागणी केली. शिक्षक आपल्या मागण्यावर ठाम असल्याने त्यांनाही माघारी फिरावे लागले.
आप, काँग्रेस, राष्ट्रवादीचा पाठिंबा
आगशी पोलीस स्थानकातील दोन दिवसांच्या या ठिय्या आंदोलनाच्या काळात विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आम आदमी पक्षाचे नेते राहुल म्हांबरे, प्रतिमा कुतिन्हो, वाल्मिकी नाईक, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, आमदार आलेक्स रेजिनाल्ड, सांगेचे आमदार प्रसाद गांवकर यासह अन्य काही नेत्यांनी भेट घेऊन पॅरा शिक्षकांना पाठिंबा दिला. आप व काँग्रेसतर्फे तसेच आमदार प्रसाद गांवकर यांनी नाश्ता पाणी व जेवणाची व्यवस्था केली.
भाजपाने आजवर आश्वासनांवरच झुलवत ठेवले
भाजपा सरकारने पॅरा शिक्षकांना नोकरीत कायम करण्याचे आश्वासन देऊन गेली काही वर्षे कायम झुलवीत ठेवल्याचे संघटनेच्या अध्यक्ष स्मिता देसाई यांनी सांगितले. गेली 15 वर्षे 129 शिक्षिका गोव्यातील विविध तालुक्यामधील सरकारी प्राथमिक शाळांमध्ये सेवा देत आहेत. सुरुवातील बराच काळ अगदी तुटपुंज्या पगारावर ग्रामीण भागात आम्ही सेवा दिली. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना 2017 मध्ये डीएलएडचे प्रशिक्षण पूर्ण करून नोकरीत कायम करण्याची हमी देण्यात आली होती. हा दोन वर्षांचा कोर्स काही मोजक्याच शिक्षिका सोडल्यास बहुतेकांनी पूर्ण केला. सुरुवातीला केवळ इंग्रजी विषयाच्या शिक्षिका म्हणून आम्हाला नोकरीत घेतले होते. पण सध्या गणित, इंग्रजी व इतर सर्व विषय पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना आम्ही शिकवतो. ग्रामीण भागातील काही शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्यामुळे पॅरा शिक्षकच संपूर्ण शाळा सांभाळतात. कायमस्वरुपी शिक्षकांना वेळोवेळी जे प्रशिक्षण दिले जाते, वर्कशिट कराव्या लागतात ते सर्व पॅरा शिक्षकही करतात. सन 2017 सालच्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने पॅरा शिक्षकांना नोकरीत कायम करण्याचे स्पष्ट आश्वासन दिलेले आहे. 2016 साली भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या विनय तेंडुलकरनी यांनीही तसे लेखी पत्र दिलेले आहे. पर्रीकरानी विधानसभेत पॅरा शिक्षकांना कायम करण्याचा मुद्दा मांडलेला आहे. मात्र आता तेच भाजपा सरकार आता यूटर्न घेत आहे.
नवीन शिक्षक भरतीमध्ये विनाअट सामावून घ्या
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत बोलताना राज्यात विविध सरकारी खात्यांमध्ये पंधरा हजार कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर कामाला असल्याचे सांगितले. जसजशी नोकरभरती होईल, तसे त्यांना टप्प्याटप्प्याने सेवेत कायम केले जाईल. पॅरा शिक्षिकांनाही ही मुभा असेल. मात्र बऱयाच शिक्षकांची पंधरा वर्षे नोकरी झाली असून काहीजणांनी वयाची पन्नाशी ओलांडली आहे. यापुढे अजून कंत्राट नकोच. आमच्या भवितव्याचा विचार करुन नवीन शिक्षक भरतीप्रक्रियेत विनाअट सर्व पॅरा शिक्षकांना सामावून घेण्याची त्यांची मागणी आहे.